अमरावतीत भाजप कार्यकर्त्यांचा रोष; पदाधिकार्‍यांना रस्त्यावरच घेराव

महापालिका निवडणूक उमेदवारीत नाराजीचा फटाका, वरिष्ठ नेत्यांना थेट सवाल

अमरावती /31 डिसेंबर – महापालिका निवडणुकीसाठी उमेदवारी न मिळाल्याने भाजपमध्ये नाराजीचा स्फोट होऊ लागला आहे. इच्छुक कार्यकर्त्यांची गर्दी अनेक दिवसांपासून पक्षाच्या कार्यालयात दिसत होती, पण उमेदवारीची यादी जाहीर होताच संताप रस्त्यावर फूटला. काल सायंकाळी सुरू झालेला रोष आज दुसर्‍या दिवशीही थांबला नाही; भाजपचे पदाधिकारी जयंत डेहनकर आणि प्रदेश प्रवक्ते शिवराय कुळकर्णी यांना नाराज कार्यकर्त्यांनी रस्त्यावरच घेराव घालून जबाब मागितला. भररस्त्यावर घडलेल्या या घटनेत एका कार्यकर्त्याने आरोप केला, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना शिव्या देणार्‍यांना तिकीट दिले जाते, आम्ही वर्षानुवर्षे पक्षासाठी झगडलो, तरी उमेदवारी नाकारली गेली. जयंत डेहनकर आणि शिवराय कुळकर्णी हे भाजपच्या कार्यालयाकडे जात असताना कार्यकर्त्यांनी त्यांना रस्त्यातच रोखले. भाजपमध्ये नेत्यांच्या नातेवाईकांना किंवा नव्याने प्रवेश झालेल्यांना उमेदवारी दिली जाते. आम्ही पक्षासाठी प्रामाणिकपणे काम केले, पण आमची किंमत काहीच नाही, असे नाराज कार्यकर्त्यांनी रोष व्यक्त केला. शिवराय कुळकर्णी यांनी कार्यकर्त्यांची समजूत करण्याचा प्रयत्न केला; मात्र, रागीट कार्यकर्ते काही ऐकण्याच्या मन:स्थितीत नव्हते. मी आपल्यासोबत रस्त्यावर बोलणार नाही, चर्चा कार्यालयात करावी लागेल, असे कुळकर्णी म्हणाले; परंतु कार्यकर्त्यांनी कार्यालयात पोहचण्याचीही इच्छा नाही, असे स्पष्ट केले. उ00मेदवारी न मिळाल्यामुळे काही कार्यकर्त्यांनी डोळ्यात अश्रू धारा सोडल्या, तर काहींनी समाज माध्यमांवर विश्वासघात झाल्याचे संदेश प्रसारित केले. भाजपने मंगळवारी दुपारी बारा वाजताच्या सुमारास उमेदवारांना बी फॉर्मचे वाटप डॉ. नितीन धांडे यांच्या कॅम्प परिसरातील बंगल्यावर केले. या वाटपानंतर अनेक वर्षांपासून पक्षासाठी प्रामाणिकपणे काम करणार्‍या कार्यकर्त्यांनी नाराजी व्यक्त केली.एका महिलेने तर धमकी दिली, मी जगायचेच नाही, जे करेन त्यासाठी भाजपचे पदाधिकारीच जबाबदार राहतील. अनेक कार्यकर्त्यांनी आरोप केला की, उमेदवारी वाटप जात, नातेवाईक किंवा नव्याने प्रवेश झालेल्यांवर आधारित झाले आहे. नाराज कार्यकर्त्यांनी उघडपणे सांगितले की, भाजपमध्ये आता ओबीसींसाठी स्थान उरलेले नाही. अमरावतीतील भाजपमध्ये या नाराजीतून स्पष्ट होते की, पक्षाच्या उमेदवारीच्या प्रक्रियेत पारदर्शकतेच्या अभावामुळे कार्यकर्त्यांमध्ये अस्वस्थता आणि रोष वाढत आहे, आणि महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही घटना पक्षासाठी मोठा आव्हान ठरणार आहे.

संबंधित बातम्या

Back to top button