शासकीय योजनेतून वाटप केले जाणारे तांदूळ बाजारात विक्रीसाठी
बेनोडा (शहीद) येथील किराणा दुकानदारासह तिघांविरुध्द गुन्हा

वरुड । 1 जुलै– शासकीय धान्य वितरण करणारे दुकान व काही ग्राहकांनी विकलेले तांदूळ बाजारपेठेत विक्रीसाठी आणल्याप्रकरणी तहसिल कार्यालयाच्या निरिक्षण अधिकार्यांनी राबविलेल्या धाडसत्रामध्ये बेनोडा (शहीद) येथील एका किराणा दुकानदारासह वरुड येथील दोन व्यापार्यांविरुध्द अत्यावश्यक वस्तू अधिनियमानुसार कारवाही करण्यात आली आहे. सविस्तर माहीतीनुसार, तहसिल कार्यालयातील निरीक्षण अधिकारी निखील नलावडे यांचे कार्यक्षेत्रात जिवनाश्यक वस्तु अधिनियम 1955 मधील तरतुदीनुसार अनुसुचीत केलेल्या वस्तुचे विवरणावर देखरेख ठेवण्याचे कार्य करतात. 30 जून 2025 रोजी दुपारी 1 च्या सुमारास विश्रामगृह परीसरात वरुड येथे आले असता या ठिकाणावरुन एक गाडी वाहन टेम्पो 407 हे भरुन जाताना दिसले त्यानुसार निरिक्षण अधिकार्यांनी सदर गाडीचा पाठलाग केला असता एम.एच.31 सीबी 4582 क्रमाकांची गाडी कृषि उत्पन्न बाजार समिती परिसरातील दिशेने जातांना दिसली. ती गाडी तेथुन पुढे वखार महामंडळाच्या बाजुने असलेल्या पत्त्याचे शेड असलेल्या गोदामाचे समोर थांबली तेव्हा तेथे गेले असता गोदामामध्ये काही हमाल व कामगार उपस्थित होते. त्याअनुषंगाने गाडी चालक आशिष पांडे यांना विचारले असता सदर धान्य कोणाचे व कोठुन आणले आहे? त्यांनी अभिजीत इंगोले (28) रा.बेनोडा याचे नाव सांगितले. त्यानुसार अभिजीत इंगोले यांना बोलावुन सदर धान्यसाठा कोठुन आणला? याची चौकशी करुन बयाण नोंदविण्यात आले. त्यानुसार अभिजीत इंगोले यांचे बेनोडा येथे किराणा दुकान असुन त्या ठिकाणी परिसरातील राशनकार्ड धारक यांचेकडुन गहु, तांदुळ खरेदी करुन त्या बदल्यात किराणा साहित्य देण्यात येते व सदर एकत्रित धान्यसाठा जमा करुन वरुड येथील ठोक व्यापार्यांकडे 23 रुपये प्रति किलो प्रमाणे विक्री करीत असतो, असे सांगितले. त्यामुळे सदर धान्यसाठा प्रथमदर्शनी अवैध असल्याचे आढळुन आले. सदर धान्य तांदुळ व गाडी अशी 40 क्विंटल जप्ती नाम्यानुसार जप्त करण्यात आली. त्या नुसार एकुण 80 कट्टे, 40 क्विंटल व धान्याची अंदाजे किंमत 92 हजार रुपये व गाडी किंमत अंदाजे किंमत 3 लाख रुपये असा एकूण 3 लाख 92 हजार रुपये धान्य जप्त करण्यात आले. सदर धान्य नंतर एम.एच.27 बीएक्स 6465 या गाडीमध्ये भरुन माल जप्त करण्यात आला. अंदाजीत किंमत 1 लाख 15 हजार रुपये पोलीस स्टेशन येथे आणण्यात आला. एकंदरीत अभिजीत इंगोले हे राशनकार्ड धारकांकडुन किरकोळ स्वरुपात तांदुळ खरेदी विक्री व्यवहार अवैधपणे शासकीय तांदुळ खरेदी-विक्री करीत असल्याचे प्रथमदर्शनी निष्पन्न होते व तो तांदुळ अभिजीत इंगोले यांनी खरेदी केलेला तांदुळ त्यांच्या आर्थीक फायद्याकरीता वरुड येथील एक व्यापारी विनापरवाना धान्यसाठा खरेदी करुन सदर साठा जमा करुन आर्थीक फायद्याकरीता अवैधरित्या जमा करुन विक्री करीत असल्याचे प्रथमदर्शनी आढळुन येते. या प्रकरणी तहसिल कार्यालय निरीक्षण अधिकारी निखील नलावडे यांचे फिर्यादीवरुन वरुड पोलिसांनी अत्यावश्यक वस्तू अधिनियम 1955 (3), (7), भा.न्या.सं.2023 कलम 351 (2), (3) अन्वये अभिजीत नामदेव इंगोले रा.बेनोडा (शहीद) व वरुड शहरातील दोन व्यापार्यांचे विरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर कारवाही जिल्हा पुरवठा अधिकारी निनाद लांडे व तहसिलदार रविंद्र चव्हाण यांचे मार्गदर्शनाखाली निरिक्षक अधिकारी निखिल नलावडे, नायब तहसिलदार पंकज चव्हाण यांचेसह मंडळ अधिकारी वैशाली मिसाळ, तलाठी विपीन पेठे, एस.एच.पवार, कोतवाल नरेंद्र बघेले याच्यासह पी.डी.सोळंके, नितेश ठाकरे व पोलिस कर्मचार्यांनी केली. पुढील तपास ठाणेदार अर्जुन ठोसरे यांचे मार्गदर्शनाखाली सुरु आहे.




