डॉक्टरविना आयुर्वेदिक दवाखाने व फिरते पथक

मेळघाटातील आदिवासी आरोग्य सेवा कोलमडली

चिखलदरा /28 डिसेंबर : महाराष्ट्र शासन व केंद्र सरकारकडून दरवर्षी मेळघाटातील आरोग्य सेवांसाठी कोट्यवधी रुपयांचा निधी खर्च केला जात असतानाही कुपोषण, माता मृत्यू व बालमृत्यूचे सत्र थांबत नसल्याचे पुन्हा एकदा समोर आले आहे. त्यातच खारी येथील आयुर्वेदिक फिरते पथक व एकताई आयुर्वेदिक दवाखाना हे गेल्या काही दिवसांपासून डॉक्टरविनाच सुरू असल्याची धक्कादायक बाब उघडकीस आली आहे. त्यामुळे दुर्गम आदिवासी भागातील आरोग्य सेवा अक्षरशः कोलमडली आहे. खारी परिसरात आदिवासी लोकसंख्या मोठ्या प्रमाणावर असून ताप, सर्दी, अंगदुखी, जखमा तसेच गरोदर माता, लहान मुले व वृद्ध नागरिकांच्या उपचारांसाठी एकताई आयुर्वेदिक दवाखाना व खारी फिरते पथक हाच प्रमुख आधार होता. मात्र डॉक्टर अनुपस्थित असल्याने हा दवाखाना केवळ नावापुरताच उरला असून अनेक रुग्णांना उपचाराविना रिकाम्या हाताने परतावे लागत आहे.
फिरत्या पथकाचा मुख्य उद्देश दुर्गम पाड्यांवरील रुग्णांपर्यंत थेट आरोग्य सेवा पोहोचवणे हा असतो. प्रत्यक्षात मात्र डॉक्टरच उपलब्ध नसल्याने फिरते पथक निष्क्रिय झाले आहे. परिणामी रुग्णांना खासगी दवाखान्यांचा आधार घ्यावा लागत असून आर्थिकदृष्ट्या कमकुवत असलेल्या आदिवासी बांधवांवर अतिरिक्त खर्चाचा बोजा पडत आहे. अनेक वेळा पैशाअभावी उपचारच टाळले जात असल्याचीही गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे.
स्थानिक नागरिकांनी डॉक्टर अनुपस्थितीबाबत वारंवार आरोग्य विभागाकडे तक्रारी करूनही अद्याप ठोस कारवाई झालेली नाही. थंडीच्या दिवसांत आजारांचे प्रमाण वाढत असताना आरोग्य सेवा बंद पडणे ही अत्यंत गंभीर बाब असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. आधीच अपुर्‍या असलेल्या आदिवासी भागातील आरोग्य सुविधांमध्ये उपलब्ध दवाखानेही डॉक्टरविना ठेवणे हे प्रशासनाच्या उदासीनतेचे घातक उदाहरण असल्याचा आरोप होत आहे. शासनाच्या विविध आरोग्य योजनांच्या जाहिराती कागदावरच मर्यादित राहिल्या असून प्रत्यक्षात मात्र आदिवासी रुग्णांना सेवा मिळत नसल्याची खंत नागरिकांनी व्यक्त केली आहे. या प्रकरणी वरिष्ठ आरोग्य अधिकार्‍यांनी तातडीने लक्ष घालून एकताई आयुर्वेदिक दवाखाना व खारी फिरते पथक येथे कायमस्वरूपी डॉक्टर नियुक्त करण्याची जोरदार मागणी करण्यात येत आहे. अन्यथा आदिवासी बांधवांच्या आरोग्याचा प्रश्न अधिक गंभीर बनण्याची शक्यता नाकारता येत नाही.

संबंधित बातम्या

Back to top button