कुलूप तोडून जप्त केलेल्या गहाणखत मालमत्तेचा ताबा घेण्याचा प्रयत्न

राजापेठ पोलिस ठाण्यात फायनान्स कंपनीच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल

अमरावती / 19 ऑक्टोबर – टाटा कॅपिटल हाऊसिंग फायनान्स लिमिटेडने तारण ठेवलेली मालमत्ता जप्त करण्याच्या न्यायालयाच्या आदेशानंतर एका जोडप्याने मालमत्तेवरील कुलूप तोडून साहित्य ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला. एवढेच नव्हे, तर त्यांनी तेथे तैनात असलेल्या सुरक्षा रक्षकाला धमकीही दिली. फायनान्स कंपनीच्या तक्रारीवरून राजापेठ पोलिसांनी मनोज असोपा (वय 48) तसेच एका महिलेवर आणि इतर तीन अज्ञात व्यक्तींवर फौजदारी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.

टाटा कॅपिटल हाऊसिंग फायनान्स लिमिटेडचे कलेक्शन मॅनेजर विवेक प्रमोद पांडे (वय 32, राठी नगर) यांनी दाखल केलेल्या तक्रारीनुसार, मनोज असोपा आणि त्यांच्या पत्नीने टाटा कॅपिटलकडून ₹53,67,000 चे कर्ज घेतले होते. या जोडप्याने रवी नगर परिसरातील ‘असोपा निवास’ ही त्यांची मालमत्ता कंपनीकडे तारण ठेवली होती. मात्र, त्यांनी कर्जाची परतफेड केली नाही. परिणामी, हे प्रकरण न्यायालयात गेले आणि न्यायालयाच्या आदेशानुसार कंपनीने पोलिसांच्या मदतीने मालमत्ता ताब्यात घेत ती सील करून कुलूप लावले. या ठिकाणी कंपनीने अनिल रामदास चव्हाण या सुरक्षा रक्षकाची नियुक्ती केली होती.

तथापि, 17 ऑक्टोबर रोजी रात्री साडेआठच्या सुमारास मनोज असोपा, एक महिला आणि आणखी एक अज्ञात व्यक्ती असोपा निवासात आले. त्यांनी सुरक्षा रक्षकाला धमकावून कुलूप तोडले आणि मालमत्ता पुन्हा ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला. या घटनेत कंपनीचे नुकसान झाले असून, सुरक्षा रक्षकाला देखील धमकी देण्यात आली. या प्रकरणी राजापेठ पोलिसांनी भादंविच्या कलम 223, 329(4), 324(2), 351(2) आणि 352 अंतर्गत गुन्हा नोंदवून पुढील तपास सुरू केला आहे.

.

संबंधित बातम्या

Back to top button