अमरावती विद्यापीठ संशोधकांना दक्षिण आफ्रिकेचे पेटंट
डॉ. ठाकरे, डॉ. घनवटे व संशोधक पूजा मांडवीय यांचा सन्मान

* कुलगुरू डॉ. मिलींद बारहाते यांच्याकडून संशोधक चमूचे कौतुक
अमरावती /22 जानेवारी : श्री संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठाच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला असून, येथील तीन प्रतिभावंत संशोधकांनी जीवाणूंवर मात करणार्या प्रतिजैविकांची नेमकी क्षमता तपासणारे विशेष उपकरण विकसित केले आहे. या जागतिक दर्जाच्या संशोधनामुळे आता रुग्णांवरील उपचारांचा वेग वाढणार असून, या कार्याची दखल घेत दक्षिण आफ्रिका सरकारने या संशोधनाला आपले अधिकृत पेटंट बहाल केले आहे. विद्यापीठाच्या या यशामुळे विदर्भाच्या संशोधन क्षेत्राचा डंका आता सातासमुद्रापार वाजला असून आरोग्य क्षेत्रात ही मोठी क्रांती मानली जात आहे.
अमरावतीच्या मातीतील बुद्धिमत्तेने पुन्हा एकदा आपली ताकद जगाला दाखवून दिली आहे. विद्यापीठातील डॉ. प्रशांत ठाकरे, डॉ. नीरज घनवटे आणि संशोधक विद्यार्थिनी पुजा मांडवीय यांनी एकत्र येत जीवाणूंवर रामबाण उपाय शोधणारे एक विशेष संच (किट) तयार केले आहे. या संशोधनाचे नाव तांत्रिक भाषेत असले तरी, सोप्या शब्दांत सांगायचे तर यामुळे कोणत्याही रोगाच्या जीवाणूंवर कोणते औषध किती प्रमाणात आणि किती वेगाने परिणाम करेल, हे आता काही क्षणांत स्पष्ट होणार आहे. आरोग्य क्षेत्रात अचूक औषधोपचारांसाठी हे संशोधन एखाद्या संजीवनीप्रमाणे ठरणार आहे. विशेष म्हणजे डॉ. ठाकरे आणि डॉ. घनवटे या जोडीचे हे तिसरे आंतरराष्ट्रीय यश आहे. यापूर्वी कोरोनाच्या भीषण संकटात या वीरांनी अमरावती जिल्ह्यात स्वतःची प्रयोगशाळा उभी करून पाच लाखांहून अधिक चाचण्या केल्या होत्या. त्यांच्या याच निस्वार्थ सेवेची आणि बुद्धिमत्तेची दखल नुकतीच हैदराबाद येथील आंतरराष्ट्रीय परिषदेत घेण्यात आली असून त्यांना विशेष पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. या अभूतपूर्व यशाबद्दल विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. मिलींद बारहाते, प्र-कुलगुरू डॉ. महेंद्र ढोरे आणि कुलसचिव डॉ. अविनाश असनारे यांनी संपूर्ण टीमचे तोंडभरून कौतुक केले आहे. विदर्भातील संशोधक आता केवळ स्थानिक पातळीवर मर्यादित न राहता जागतिक स्तरावर आपले नाणे खणखणीत वाजवत असल्याचे यातून सिद्ध झाले आहे. संपूर्ण विद्यापीठ प्रशासन आणि शिक्षण वर्तुळात या ऐतिहासिक कामगिरीमुळे आनंदाचे वातावरण पसरले आहे.
कोरोना काळातील आरोग्यदूत आता जागतिक संशोधक- या संशोधक चमूने केवळ कागदावर संशोधन न करता प्रत्यक्ष जमिनीवर उतरून काम केले आहे. कोरोना काळात जेव्हा सर्वत्र भीतीचे वातावरण होते, तेव्हा याच डॉक्टरांनी रात्रंदिवस मेहनत घेऊन जिल्ह्यात चाचण्यांची मोठी सुविधा निर्माण केली होती. त्यांच्या याच अनुभवातून आणि जिद्दीतून आज हे तिसरे आंतरराष्ट्रीय पेटंट आकारास आले आहे.




