अमरावती-मुंबई एक्स्प्रेस नाशिकरोडपर्यंतच धावणार
मुसळधार पावसाचा फटका, वाहतूक विस्कळीत

-सेवाग्राम एक्सप्रेस रद्द, प्रवाशांचे हाल
अमरावती / 19 ऑगस्ट : मुंबईत गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसाचा रेल्वे वाहतुकीवर मोठा परिणाम झाला आहे. रेल्वे रुळांवर साचलेल्या पाण्यामुळे मध्य रेल्वे प्रशासनाने अनेक महत्त्वाच्या गाड्या रद्द करण्याचा निर्णय घेतला असून, त्यात अमरावती -मुंबई एक्स्प्रेसलाही फटका बसला आहे. रेल्वे प्रशासनाकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, अमरावती-मुंबई एक्स्प्रेस (12112) ही गाडी 19 ऑगस्ट रोजी नाशिकरोडपर्यंतच धावली. तर परतीची गाडी मुंबई-अमरावती एक्स्प्रेस (12111) ही 20 ऑगस्ट रोजी मुंबईऐवजी नाशिकरोडवरूनच आपल्या नियोजित वेळेत सुटेल. त्यामुळे मुंबईकडे थेट प्रवास करण्याचे नियोजन केलेल्या प्रवाशांना मोठा फटका बसणार आहे.
रेल्वेने प्रवाशांना आवाहन केले आहे की, प्रवासाला निघण्यापूर्वी आपल्या गाडीची सद्यस्थिती तपासून घ्यावी, जेणेकरून अनावश्यक गैरसोय होणार नाही. अमरावती-मुंबई ही मुंबई व विदर्भ यांच्यातील रेल्वे संपर्काची महत्त्वाची गाडी असल्याने, ऐनवेळी झालेले बदल अनेक प्रवाशांसाठी डोकेदुखी ठरत आहेत. आधीच इतर गाड्याही 4 ते 5 तास उशिराने धावत असल्याने नाशिकरोडवर उतरलेल्या प्रवाशांना पुढे मुंबई गाठण्यासाठी बस किंवा इतर पर्यायी साधनांचा आधार घ्यावा लागत आहे.
मुंबई-जालना वंदे भारत एक्स्प्रेस, मुंबई-हिंगोली जनशताब्दी, मुंबई-नागपूर सेवाग्राम एक्स्प्रेससह अनेक गाड्या पूर्णपणे रद्द करण्यात आल्या आहेत. उत्तर भारतातून येणार्या गाड्याही वेळापत्रकाच्या बाहेर धावत असल्याने प्रमुख स्थानकांवर प्रवासी अडकलेले दिसत आहेत.




