अप्पर वर्धा धरणाचे सर्व 13 दरवाजे पुन्हा उघडले
वाढत्या पर्जन्यामुळे जलसाठ्यात झपाट्याने वाढ

-रविवारी परिसरात पर्यटकांची गर्दी वाढणार
मोर्शी / 12 सप्टेंबर : अमरावती जिल्ह्याची जीवनवाहिनी मानले जाणारे अप्पर वर्धा धरण पावसामुळे तुडुंब भरले असून आज शुक्रवारी रात्री पुन्हा धरणाचे 13 पैकी सर्व 13 वक्रद्वार दरवाजे उघडण्यात आले. हे दरवाजे सुमारे 40 सेंटिमीटरने उघडल्याने 844 घनमीटर प्रति सेकंद पाण्याचा विसर्ग वर्धा नदीपात्रात सोडण्यात येत आहे.
मध्यप्रदेशातील जाम नदी आणि सालबर्डी मार्गे वाहणारी माडू नदी तुडुंब भरून धरणात जलप्रवाह वाढवत आहे. यामुळे धरणातील जलसाठा झपाट्याने वाढत असून, पर्जन्यमानाचा अंदाज लक्षात घेऊन तसेच जलाशय प्रचलन सूचीप्रमाणे विसर्ग करण्याची वेळ आल्याचे अधिकार्यांनी स्पष्ट केले. सप्टेंबरच्या सुरुवातीला धरणातील पाण्याचा साठा 96.27 टक्क्यांवर होता. सध्या पाणी साठा 97.87 टक्क्यांपर्यंत पोहोचला असून, निर्धारित पातळी 342.50 मीटरच्या तुलनेत 342.37 मीटर एवढी पातळी झाली आहे.
दरवाजे उघडल्याने वर्धा नदीखोर्यातील पाण्याची पातळी आणखी वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे. यामुळे खालच्या भागातील नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे. दरम्यान, दोन दिवस सुट्टी असल्याने अप्पर वर्धा धरण परिसरात पर्यटकांची मोठी गर्दी उसळण्याची शक्यता आहे. पाण्याचे तुषार अंगावर झेलण्यासाठी आणि धरणाचे विहंगम दृश्य टिपण्यासाठी नागरिक धरण परिसराकडे आकर्षित होत आहेत.




