आंदोलनानंतर सफाई कंत्राटदारांना 4 कोटींची थकबाकी अदा

आठ महिन्यांपासून मोबदला नाही

-कंत्राटदार-कामगारांची मनपात धडक
-वाहने व घंटा गाड्यांसह पोहोचले
अमरावती / 6 जून: शहरातील विविध प्रभागात स्वच्छतेची कामे करणार्‍या सफाई कंत्राटदारांना गत आठ महिन्यांपासून मोबदला अदा करण्यात न आल्याने आज या कंत्राटदारांनी आक्रमक भूमिका घेतली. कचरा संकलनासाठीची वाहने आणि घंटा गाड्यांसह त्यांनी महापालिकेत धडक दिली. त्यानंतर महापालिका प्रशासनाने नरमाईची भूमिका घेत कंत्राटदारांना तात्काळ दोन महिन्यांचा मोबदला देण्याचे मान्य करुन 4 कोटी रुपयांची रक्कम अदा केली. त्यामुळे हे आंदोलन मागे घेण्यात आले. 5 तास चाललेल्या या आंदोलनामुळे महापालिका मुख्यालयात खळबळ उडाली होती.
अमरावती महापालिकेने शहराच्या साफसफाईचे कंत्राट झोननिहाय दिले आहे. झोन क्रमांक 1 आणि 5 च्या स्वच्छतेचे कंत्राट राजेश गुप्ता यांच्याकडे आहे. शहरातील पाचही झोनमध्ये घरोघरी जावून कचरा गोळा करण्यासाठी 136 वाहने तसेच कंपोस्ट डेपोत कंटेनर नेण्यासाठी 50 ट्रक आहेत. कंत्राटदारांचे म्हणणे आहे की, कंत्राट घेतानाच फायनांसवर या वाहनांची खरेदी करण्यात आली आहे. त्याच्या किस्त दर महिन्याला फायनांस कंपनीकडे अदा कराव्या लागतात. सोबतच दररोज या वाहनांना 22 लाख रुपयांचे डिझेल लागते. सफाई कर्मचार्‍यांना वेतन अदा करण्याची जबाबदारीही कंत्राटदारांची आहे. दरमहा त्यांचा खर्च 2 कोटी 80 लाख रुपये एवढा आहे.
अशात नोव्हेंबर 2024 पासून जून 2025 सुरु झाल्यानंतरही या कालावधीतील वेतन अद्याप महापालिकेने अदा केलेले नाही. प्रत्येक झोनची किमान 7 कोटी रुपयांची थकबाकी महापालिकेकडे आहे. कर्मचार्‍यांचे वेतन आणि वाहनाच्या डिझेलसाठी आम्ही लोकांकडून व्याजाने घेतले असून बँकांकडून कर्ज काढले आहे. काहींनी घरही गहान ठेवले असल्याचे कंत्राटदारांचे म्हणणे आहे. महापालिकेला एकमुस्त आठ महिन्यांची थकबाकी ेदणे शक्य नसेल तर किमान दोन-दोन महिन्यांची रक्कम अदा करण्याची मागणी कंत्राटदारांनी मनपा आयुक्त सचिन कलंत्रे यांच्याकडे केली होती.
आज त्यासाठीच झोन क्रमांक 1 आणि 5 चे ठेकेदार राजेश गुप्ता यांनी दोन्ही झोनमधील स्वच्छतेची कामे बंद ठेवून वाहने व घंटागाड्या व आपल्या कामगारांसह मनपात धडक दिली. या प्रकारामुळे येथे काही वेळ तणावही निर्माण झाला होता. याबाबत माहिती मिळताच शहर कोतवाली पोलिसांनी महापालिकेत पोलिस बंदोबस्तही तैनात केला होता. त्यानंतर कंत्राटदार कर्नल कलोती, सचिन भेंडे आणि राजेश गुप्ता यांनी मनपा आयुक्त सचिन कलंत्रे यांची भेट घेउन चर्चा केली. यावेळी अतिरिक्त आयुक्त महेश देशमुख, शिल्पा नाईक, उपायुक्त डॉ. मेघना वासनकर उपस्थित होते. यावेळी कंत्राटदारांनी आपली व्यथा अधिकार्‍यांसमोर मांडली. तेव्हा सचिन कलंत्रे यांनी लगेच एका महिन्याच्या वेतनाची व्यवस्था करण्याची तयारी दर्शविली.
मात्र कंत्राटदार किमान दोन महिन्यांची थकबाकी अदा करण्यात यावी, या मागणीवर अडून होते. अन्यथा शहरातील पाचही झोनमधील स्वच्छतेचे कामकाज शनिवारपासून पूर्णत: बंद करण्याचा इशारा यावेळी देण्यात आला. तेव्हा आयुक्त सचिन कलंत्रे यांनी सर्व पाचही झोनच्या कंत्राटदारांना आठ महिन्यांच्या थकबाकीपैकी दोन-दोन महिन्यांचे वेतन तात्काळ अदा करण्याचे मान्य केले. लगेच 4 कोटी रुपयांची व्यवस्था करुन ती कंत्राटदारांना देण्यात आली. त्यामुळे हे आंदोलन मागे घेण्यात आले.

संबंधित बातम्या

Back to top button