अचलपूरची रणधुमाळी : एक लाख मतदार ठरवणार नगरपालिकेचे भवितव्य
112 मतदान केंद्रांवर कडेकोट बंदोबस्त; पाचशे पोलिसांची तैनाती

महिला नगराध्यक्षा पदामुळे महिला मतदारांची उपस्थिती ठरणार निर्णायक
परतवाडा /1 डिसेंबर : अचलपूर नगरपालिका निवडणुकीचा शेवटचा टप्पा आज पार पडत असून शहरात सकाळपासून मतदानाला सुरूवात झाली आहे. सकाळी साडेसात ते सायंकाळी साडेपाच या वेळेत मतदारांना मतदानाचा हक्क बजावता येणार असून निवडणुका सुरळीत पार पडाव्यात यासाठी संपूर्ण शहरात कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
अचलपूर नगरपालिकेत एकूण 99659 मतदार असून त्यामध्ये 50031 पुरुष, 49623 महिला आणि 5 तृतीयपंथी मतदारांचा समावेश आहे. महिला नगराध्यक्षा पदासाठी ही निवडणूक राखीव असल्याने महिला मतदारांची उपस्थिती निर्णायक ठरणार आहे. पुरुषांच्या तुलनेत महिला मतदार केवळ 408ने कमी असल्याने आज त्यांच्या सहभागाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
एकूण 20 प्रभागांसाठी 112 मतदान केंद्रे सज्ज असून मतदान प्रक्रियेसाठी आवश्यक सर्व साहित्य आणि मतदान यंत्रे आज सकाळी केंद्रांवर पोहोचवण्यात आली. परतवाड्यातील कल्याण मंडपम येथे गेल्या दोन दिवसांपासून मतदान अधिकारी आणि सहाय्यक कर्मचार्यांना प्रशिक्षण देण्यात आले. मतदान यंत्रांचे सील उघडणे, खराबी आल्यास करावयाची प्रक्रिया आणि मतदान केंद्रावरील सर्व नियमांबाबत त्यांना सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले आहे. मतदान सुरळीत आणि शांततेत पार पाडण्यासाठी तब्बल पाचशे पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. प्रत्येक मतदान केंद्रावर पोलीस उपस्थित असून संवेदनशील भागांमध्ये अतिरिक्त पथकांचीही नियुक्ती केली आहे. अचलपूर तालुका संवेदनशील म्हणून ओळखला जात असल्याने या वर्षीचा पोलिस बंदोबस्त मागील निवडणुकांपेक्षा अधिक मोठा असल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली.
मतदान केंद्रांमध्ये कोणत्याही प्रकारचे इलेक्ट्रॉनिक साधन, मोबाईल किंवा छायाचित्रण उपकरण नेण्यास मनाई आहे. केंद्रात मोबाईलने बोलणे, चित्रीकरण करणे किंवा इतर उपकरणे वापरणे हे नियमभंग मानले जाईल. अशा वस्तू जप्त करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. मतदान केंद्रांवर मतदान यंत्रांचे सील अधिकार्यांच्या आणि उमेदवारांच्या प्रतिनिधींच्या उपस्थितीत उघडण्यात येणार असून मतदानानंतर पुन्हा त्याच पद्धतीने यंत्रे सीलबंद केली जातील.
मतदान संपल्यानंतर सर्व यंत्रे आणि साहित्य परतवाडा येथील कल्याण मंडपम येथे पोलिसांच्या निगराणीखाली ठेवण्यात येणार आहे. संपूर्ण परिसर सीसीटीव्ही देखरेखीखाली राहणार असून तीन तारखेला सकाळी नऊ वाजता मतमोजणीला सुरुवात होईल. सहा टेबलांवर मतमोजणी केली जाणार असून उमेदवारांचे अधिकृत प्रतिनिधीच केंद्रात प्रवेश करू शकतील. मतमोजणी केंद्रातही इलेक्ट्रॉनिक साधनांवर बंदी राहील.
अचलपूर शहर आज लोकशाहीच्या या मोठ्या प्रक्रियेत सहभागी होत असून जवळपास एक लाख मतदार नगराध्यक्ष आणि नगरसेवक पदांचे भवितव्य ठरवणार आहेत.




