विद्यार्थ्यांच्या प्रलंबित मागण्यांसाठी अभाविपचा धडक मोर्चा
34 मागण्यांचे निवेदन कुलसचिवांकडे सादर

अमरावती /14 नोव्हेंबर – अखिल भारतीय विद्यार्थी परिषद (अभाविप) तर्फे विद्यार्थ्यांच्या अनेक प्रलंबित मागण्यांसाठी आज संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठावर धडक मोर्चा काढण्यात आला. या मोर्चाचे नेतृत्व प्रांत मंत्री पायल किनाके, ऋद्धेश देशमुख, ऋषभ गोहने, गौरी भारती, ओम धोटे, चंद्रकांत बोबडे, ऋषिकेश मानवटकर, प्रगती वानखेडे आणि अंशित वर्मो यांनी केले.
पाच जिल्ह्यांतील मोठ्या संख्येने विद्यार्थी सहभागी झाल्याने विद्यापीठ प्रशासनाने दोन्ही प्रवेशद्वारे बंद ठेवून सुरक्षा वाढवली होती. विद्यार्थ्यांची अशी मोठी एकत्रित उपस्थिती अलीकडील काळात प्रथमच पाहायला मिळाली.अभाविपतर्फे विद्यापीठ प्रशासनाला चार पानांचे निवेदन देऊन 34 मागण्या सादर करण्यात आल्या. त्यामध्ये शैक्षणिक दिनदर्शिकेचे काटेकोर पालन, प्रवेशाची अंतिम तारीख 15 ऑगस्ट निश्चित करावी, विद्यार्थी संघ निवडणुका पुन्हा सुरू कराव्यात, परीक्षा झाल्यानंतर 45 दिवसांत निकाल जाहीर करावा, अभ्यासक्रमाशी संबंधित अडचणी तातडीने दूर कराव्यात, शुल्कवाढ नियंत्रणात ठेवावी, मराठी व इतर भाषिक विद्यार्थ्यांसाठी भाषिक सोयी उपलब्ध कराव्यात, एनईपीशी संबंधित गोंधळ दूर करून स्पष्ट मार्गदर्शन द्यावे, सर्व महाविद्यालयांवर आवश्यक शैक्षणिक देखरेख ठेवावी, विद्यार्थ्यांना आवश्यक सुविधा आणि सेवा वेळेत उपलब्ध कराव्यात ह्या मुख्य मागण्या होत्या. प्रांत मंत्री पायल किनाके यांनी विद्यार्थ्यांना संबोधित करताना शैक्षणिक दिनदर्शिकेचे काटेकोर पालन, प्रवेशाची अंतिम तारीख 15 ऑगस्ट निश्चित करणे आणि विद्यार्थ्यांच्या प्रलंबित प्रश्नांवर तातडीने निर्णय घेणे यावर भर दिला. तसेच 15 दिवसांत सर्व 34 मागण्यांवर स्पष्ट निर्णय द्यावा, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली.




