साईनगरमध्ये उभारणार 10 कोटींचे नाट्यसंकुल
भाजप नेते तुषार भारतीय यांच्या पुढाकाराने बैठक

सांस्कृतिक मंत्री आशीष शेलार यांची घोषणा
अमरावती/ 12 नोव्हेंबर – ऐतिहासिक आणि सांस्कृतिक परंपरेने समृद्ध असलेल्या अमरावती शहराला लवकरच नवे नाट्यसंकुल मिळणार आहे. साईनगर परिसरात तब्बल 10 कोटी रुपयांच्या निधीतून अत्याधुनिक नाट्यसंकुल उभारण्यात येणार असल्याची घोषणा राज्याचे सांस्कृतिक मंत्री अॅड. आशीष शेलार यांनी केली. ही घोषणा आज मंत्रालयात झालेल्या विशेष बैठकीत करण्यात आली. ही बैठक माजी सभापती आणि भारतीय जनता पक्षाचे नेते तुषार भारतीय यांच्या पुढाकाराने आयोजित करण्यात आली होती. बैठकीत विधायक श्रीकांत भारतीय, माजी महापौर चेतन गवांडे, महापालिका आयुक्त सौम्या शर्मा चांडक, उपजिल्हाधिकारी अनिल भटकर, शहर अभियंता रविंद्र पवार तसेच सांस्कृतिक विभागाचे सचिव उपस्थित होते. अमरावतीला सांस्कृतिक आणि आध्यात्मिक केंद्र म्हणून विशेष ओळख आहे. शहरात रंगभूमीच्या विविध कलात्मक उपक्रमांना मोठी परंपरा असून, कलाकारांकडून नव्या नाट्यसंकुलाची मागणी होत होती. या पार्श्वभूमीवर तुषार भारतीय यांनी हा विषय पुढे रेटला आणि त्यानुसार मंत्री शेलार यांनी साईनगर मौजे अकोली सर्वे क्र. 25 येथील जागेवर हे नाट्यसंकुल उभारण्यास मंजुरी दिली. या निर्णयाबाबत भाजप नेते तुषार भारतीय यांनी समाधान व्यक्त करताना म्हटले की, अमरावतीच्या कलावैभवात आणखी भर पडणार असून, कलाकारांच्या दीर्घकाळच्या मागणीची पूर्तता होईल. दरम्यान, युवा रंगकर्मी विशाल रमेश तराळ आणि चित्रपट अभिनेता प्रफुल्ल जोशी यांनी या निर्णयाचे स्वागत केले. तराळ यांनी सांगितले की, कलाकारांना स्वतःच्या हक्काची आणि सन्मानाची जागा मिळणे ही अत्यंत अभिमानाची बाब आहे.




