अल्पवयीन मुलीला फूस लावून पळविले
मोर्शी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

मोर्शी /27 ऑक्टोबर : मोर्शी पोलीस स्टेशन हद्दीत राहणार्या एका अल्पवयीन मुलीला अज्ञात इसमाने फसवून पळविल्याची तक्रार मुलीच्या आईने मोर्शी पोलीस स्टेशनला दिली आहे. दि. 25 ऑक्टोबर रोजी संध्याकाळी साडेसातच्या सुमारास अल्पवयीन मुलगी ही मैत्रिणीकडे फराळासाठी जाते असे सांगून घरून निघून गेली. मात्र ती बराच वेळ घरी न आल्याने तिची आई आणि नातलगांनी तिच्या मैत्रिणीकडे जाऊन चौकशी केली. तेव्हा मैत्रिणीने सांगितले की, पूजा (टोपण नाव) माझ्या घरी आलीच नाही. यानंतर नातलगांनी परिसरात आणि नातेवाइकांकडे शोध घेतला, परंतु ती मिळाली नाही. त्यामुळे त्या अल्पवयीन मुलीला कोणीतरी अज्ञात इसमाने तिच्या अज्ञानाचा फायदा घेऊन फूस लावून पळवून नेले, असा संशय व्यक्त करण्यात आला आहे. या प्रकरणी मोर्शी पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल करण्यात आली असून पोलिसांनी भादवी कलम 363 नुसार गुन्हा नोंदवला आहे. पुढील तपास मोर्शी पोलीस करीत आहेत.




