सावंगा विठोबा येथे गुढीपाडव्याला भक्तांची उसळली प्रचंड गर्दी
गुढीपाडव्याला 72 फूट उंच झेंड्यांना खोळ चढविण्याचा चित्तथरारक सोहळा पार पडला

चांदूर रेल्वे/19 मार्च – तालुक्यातील सुप्रसिद्ध श्रीक्षेत्र सावंगा विठोबा येथे गुढीपाडवा-रामनवमी यात्रा महोत्सवाला ता 18 बुधवारपासून उत्साहात सुरुवात झाली असून ता 19 गुरुवार रोजी गुढीपाडव्याच्या दिवशी लाखो भाविकांची उपस्थितीत 72 फूट उंच झेंड्यांना नवीन खोळ चढविण्याचा पारंपरिक व थरारक सोहळा यात्रेचे मुख्य आकर्षण ठरले गुढीपाडवा-रामनवमी यात्रा महोत्सवाला 18 मार्च पासुन सुरूवात झाली असुनही यात्रा 27 मार्च पर्यंत चालणार आहे. देव व भक्त या समानतेचे प्रतिक 72 फुट झेंड्यांचा चित्तथरारक व नेत्रदीपक सोहळा गुढीपाडव्याच्या दिवशी दुपारी 4 वाजता संस्थानचे विश्वस्त चरणदास कांडलकर यांच्या शुभहस्ते महाराजांच्या समाधीचे विधीवत पूजन करून दोन्ही झेंड्यांना नवीन खोळ (कापड) चढविण्यात आली आहे.झेंड्यांना पायाचा स्पर्श होऊ नये म्हणून दोरांच्या सहाय्याने झेंड्यांची जुनी खोळ काढून नविन खोळ चढवली आहे.अखंड कापूर ज्योती, बासन (टाळ)ढोलकी (मृदंग)चा गजर, लाखोंच्या हजारोंच्या संख्येने सांगवा विठोबा नगरीत आलेल्या अवधूत भजन मंडळाच्या मांडीचे सुमधूर गायनात आणि भक्तिभावपूर्ण वातावरणात हा सोहळा विश्वस्त मंडळ व लाखो भाविकांच्या साक्षीने पार पडला 18 मार्च रोजी सकाळी 7 वाजता मंदिर व ग्राम परिसराची स्वच्छता करण्यात आली व अमावस्या निमित्त सायंकाळी 5 वाजता मंदिरात चंदन-उटी व रमणा कार्यक्रम घेण्यात आला. गुढी पाडव्याच्या दिवशी यात्रेत बाहेरगावाहून येणार्या लाखो भाविकांसाठी संस्थानची अन्नदान समिती आणि सेवाभावी मंडळा च्या वतीने प्रसाद (अन्नदान) व्यवस्था करण्यात आली आहे.श्रीक्षेत्र सावंगा विठोबा येथे येण्याकरीता अमरावती,चांदूर रेल्वे,बडनेरा,नेर(परसोपंत)आगारातील एसटी यात्रा-बसची व्यवस्था केली आहे.या यात्रा महोत्सवात भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रमाचा लाभ घ्यावा तसेच हा महोत्सव यशस्वी करण्यासाठी शांतता, सुव्यवस्था व स्वयंशिस्त पाळावी,असे आवाहन श्री विठोबा संस्थान च्या वतीने करण्यात आले आहे, यात्रेत मोठ्या संख्येने येणार्या भाविक भक्तांच्या वाहन पार्किंग व्यवस्था कायदा व सुव्यवस्था राखण्या करिता पोलीस विभागाच्या वतीने बंदोबस्त करण्यात आले आहे.




