बनावट सोने विकणारी टोळी जेरबंद

तीन चोरट्यांच्या मुसक्या आवळल्या

* 4 लाख 67 हजार 800 रुपयांचा मुद्देमाल जप्त

तिवसा /23 जानेवारी : खोदकामात मिळालेले एक किलो सोने स्वस्त दरात देण्याचे आमिष दाखवून पाच लाख रुपये लुटणार्‍या टोळीचा ग्रामीण गुन्हे शाखेने पर्दाफाश केला आहे. चांदूर बाजार तालुक्यातील तौफीक अहमद खान गफ्फार या तरुणाला बनावट सोन्याच्या जाळ्यात ओढून ही लूट करण्यात आली होती. मात्र, तिवसा तालुक्यातील भांबोरा कालव्याजवळ घडलेल्या या घटनेनंतर पोलिसांनी अवघ्या काही तासांतच राजेश ऊर्फ श्याम सब्बर भोसले, जाजू दुआर चव्हाण आणि महेंद्र मुलीचंद भोसले या तिघांना बेड्या ठोकल्या आहेत. त्यांच्याकडून 4 लाख 67 हजार 800 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला असून, या कारवाईने फसवणूक करणार्‍या टोळ्यांचे धाबे दणाणले आहेत. सविस्तर वृत्त असे की, तक्रारदार तौफीक अहमद यांना अनोळखी व्यक्तींनी भ्रमणध्वनीवरून संपर्क साधून आपल्याकडे खोदकामात सापडलेले एक किलो सोने असल्याचे सांगितले. हे सोने केवळ पाच लाख रुपयांत देण्याचे प्रलोभन त्यांना दाखवण्यात आले होते. या व्यवहारासाठी 21 जानेवारी रोजी तिवसा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील भांबोरा कालव्याजवळ दोन्ही पक्ष समोरासमोर आले. व्यवहार होत असतानाच तौफीक यांना त्या सोन्याच्या शुद्धतेवर संशय आला. त्यांनी सोने घेण्यास नकार दिला, मात्र संधी साधून आरोपींनी त्यांच्याकडील पाच लाख रुपयांची रोकड हिसकावून पोबारा केला. या धक्कादायक प्रकारानंतर तौफीक यांनी तात्काळ पोलिसांत धाव घेऊन तक्रार नोंदवली.गुन्ह्याचे गांभीर्य ओळखून ग्रामीण गुन्हे शाखेचे निरीक्षक किरण वानखडे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक मूलचंद भांबुरकर यांच्या पथकाने तपासाची चक्रे वेगाने फिरवली. गुप्त बातमीदाराकडून मिळालेल्या माहितीनुसार, संशयित आरोपी राजेश भोसले हा आपल्या साथीदारांसह कुर्हा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील कौंडण्यपूर फाट्यावर उभा असल्याची खात्री पटली. पोलिसांनी सापळा रचून राजेश भोसले (38, रा. कालागोटा), जाजू चव्हाण (35, रा. कालागोटा) आणि महेंद्र भोसले (44, रा. मार्डा) यांना ताब्यात घेतले. पोलिसी खाक्या दाखवताच त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली. पोलिसांनी त्यांच्याकडून 4 लाख 47 हजार 800 रुपये रोख, दोन भ्रमणध्वनी आणि एक किलो वजनाची पितळी बनावट सोन्याची नाणी असा एकूण 4 लाख 67 हजार 800 रुपयांचा माल जप्त केला. ही धडक कारवाई संतोष तेलंग, सुधीर बावने, अमोल देशमुख, मंगेश लकडे, दिनेश कनोजिया, दीपक पाल, दीपक पाटील, मारोती वैद्य, अनिल लिंगोट, सागर निमकर, हेमंत डहाके, सागर धापड, गुणवंत सिरसाठ, विकास अंजीकर, किशोर सुने आणि प्रशिक्षक वानखडे यांच्या पथकाने यशस्वीरित्या पार पाडली.

 

संबंधित बातम्या

Back to top button