मॉर्निंग वॉकला गेलेल्या कंत्राटदाराला चिरडले
पत्नी गंभीर जखमी, चांदूर बाजार येथील वलगाव रोडवरील घटना

चांदूर बाजार/19 जानेवारी : स्थानिक वलगाव रस्त्यावर सोमवारी रोजी पहाटेच्या सुमारास सूडाच्या भावनेने एका कंत्राटदाराचा थरारक पद्धतीने बळी घेण्यात आला. मुरूम व्यवसायातील जुन्या वैमनस्यातून अजय लंगोटे याने आपली चारचाकी गाडी निलेश बदुकले यांच्या अंगावर चढवून त्यांची हत्या केली, तर या घटनेत निलेश यांच्या पत्नी सरिता बदुकले या मृत्यूशी झुंज देत आहेत. थंड डोक्याने केलेला हा कट आणि रस्त्यावरील रक्ताचा सडा पाहून संपूर्ण परिसरात मोठी खळबळ उडाली असून पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मूळचे ब्राह्मणवाडा थडी येथील असलेले निलेश बदुकले हे चांदूर बाजारमध्ये कुटुंबासह राहून बांधकाम साहित्याचा व्यवसाय करायचे. याच व्यवसायावरून थूगाव पिंपरी येथील अजय लंगोटे याच्याशी त्यांचे बिनसले होते. अजयने निलेशला आधीच जीवे मारण्याची धमकी दिली होती. सोमवारी सकाळी साडेसहाच्या सुमारास निलेश आणि त्यांच्या पत्नी नेहमीप्रमाणे सकाळी चालायला गेले असता, अजयने दबा धरून आपली महिंद्रा गाडी त्यांच्या दिशेने वळवली. त्याने नंदीनी मद्यविक्री केंद्राजवळून गाडी वेगाने मागे फिरवून समोरून चालणार्या बदुकले दांपत्याला मागच्या बाजूने जोराची धडक दिली. ही धडक इतकी भीषण होती की निलेश यांचा जागीच अंत झाला आणि त्यांची पत्नी रक्तबंबाळ अवस्थेत रस्त्यावर कोसळली. या घटनेनंतर परिसरात बघ्यांची मोठी गर्दी जमली होती. स्थानिक नागरिक बाळू आकोटकर यांनी तत्काळ या पती-पत्नीला अमरावतीतील दवाखान्यात नेले, मात्र डॉक्टरांनी निलेश यांना मृत घोषित केले. निलेश यांचे वडील सुरेश बदुकले यांनी दिलेल्या तक्रारीवरून चांदूर बाजार पोलिसांनी आरोपी अजय लंगोटे याच्यावर भारतीय न्याय संहितेच्या विविध कलमान्वये खुनाचा गुन्हा नोंदवला आहे. रक्ताने माखलेला हा रस्ता आणि त्यावरील टायरचे व्रण पाहून आरोपीने किती क्रूरपणे हे कृत्य केले, याचा अंदाज येतो. सध्या आरोपी फरार असून पोलीस त्याचा कसून शोध घेत आहेत.
खुनशी वृत्तीचा थरार… -आरोपीने बदुकले दांपत्याचा पाठलाग करून त्यांना नीट पाहिले आणि गाडी उलटवून अत्यंत क्रूरपणे चिरडले. रस्त्याच्या कडेला असलेल्या फरशांवर उमटलेले टायरचे ठसे या भीषण हल्ल्याची साक्ष देत आहेत. व्यवसायातील वादाचे रूपांतर अशा रक्तरंजित हत्येत झाल्याने चांदूर बाजार शहरात दहशतीचे वातावरण पसरले आहे.




