चोरीच्या 9 दुचाकींसह 3.50 लाखांचा मुद्देमाल जप्त
कुख्यात वाहन चोर जाळ्यात

-गुन्हे शाखा – 2 ची कारवाई
अमरावती / 29 जुलै : अमरावती शहरासह ग्रामीण भागात आणि शेजारच्या जिल्ह्यांमध्ये दुचाकींची चोरी करणार्या कुख्यात वाहन चोरट्याला गुन्हे शाखा युनिट – 2 च्या पथकाने आज अटक केली. चोरीची दुचाकी विकण्यासाठी अमरावती शहरात आला असताना गोपनिय माहितीवरुन तो पोलिसांच्या जाळ्यात अडकला. दीपक शंकरराव मारवाडी (35) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. तो मुळ अमरावती शहरातील वल्लभ नगर परिसरातील रहिवासी आहे. सध्या तो मुर्तिजापूर येथे अण्णाभाउ साठे नगरात वास्तव्यास आहे. दीपक मारवाडी याच्याकडून चोरीच्या 9 दुचाकींसह 3 लाख 50 हजार रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे. दीपक मारवाडी हा खूनासह अन्य गंभीर गुन्ह्यातही आरोपी असल्याची माहिती मिळाली आहे.
आज दुपारी दीपक मारवाडी त्याने चोरलेली एमएच 30 / बीव्ही 7018 क्रमांकाची दुचाकी विक्रीसाठी अमरावती येथे घेउन आला होता. गांधी चौकात एकविरा पार्किंगजवळ याच दुचाकीवर बसून तो कोणाचीतरी प्रतिक्षा करित होता. याबाबत गुन्हे शाखा युनिट-2 ला गोपनिय माहिती मिळाली. त्याआधारे पोलिसांनी गांधी चौकात जावून दीपक परदेशीला ताब्यात घेतले आणि त्याची चौकशी केली. सुरुवातीला त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली. पोलिस हिसका दाखविताच त्याने गुन्ह्यांची कबुली दिली.
अमरावती शहरात दुचाकींची चोरी करुन त्या आपण निर्जनस्थळी नेउन ठेवतो व स्वत: वापरतो, असे त्याने पोलिसांना सांगितले. अमरावती शहरासोबतच ग्रामीण भागात तसेच वाशिम, अकोला जिल्ह्यात आपण दुचाकींची चोरी केल्याचे त्याने मान्य केले. त्याने दिलेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी चोरीच्या 9 दुचाकी जप्त केल्या आहेत. दीपकच्या चौकशीतून चार दुचाकी त्याने अमरावती शहरातील खोलापुरी गेट, कोतवाली, राजापेठ आणि कारंजा लाड हद्दीतून चोरी केल्याचे निष्पन्न झाले. अन्य 5 दुचाकी त्याने कुठून लंपास केल्या, याबाबत पोलिस चौकशी करित आहेत.
ही कारवाई पोलिस आयुक्त अरविंद चावरिया, उपायुक्त गणेश शिंदे, श्याम घुगे, रमेश धुमाळ, एसीपी शिवाजी बचाटे, यांच्या मार्गदर्शनात तसेच गुन्हे शाखा युनिट – 2 चे निरिक्षक संदिप चव्हाण यांच्या नेतृत्वात सहाय्यक पोलिस निरिक्षक अमोल कडू, महेश इंगोले, उपनिरिक्षक संजय वानखडे, अंमलदार महेंद्र येवतीकर, दीपक सुंदरकर, गजानन ढेवले, आस्तिक देशमुख, मनोज ठोसर, जहिरोद्दीन, संग्राम भोजने, मंगेश शिंदे, अतुल संभे, विशाल वाकपांजर, राहुल ढेंगेकर, योगेश पवार, राजीक रायलीवाले, सागर ठाकरे, चेतन कराळे, निलेश वंजारी, संदीप खंडारे, राहुल दुधे, चेतन शर्मा यांनी केली.




