150 किलो प्लास्टिक पिशव्या जप्त; दुकानाला सील

प्लास्टिक बंदीची कठोर अंमलबजावणी

-सक्करसाथमध्ये मनपा पथकाचा छापा
अमरावती / 10 जुलै: अमरावती शहरात प्लास्टिक बंदीच्या अंमलबजावणीत महापालिकेने मोठी कारवाई करत प्लॅस्टिक वापराविरोधात ठोस संदेश दिला आहे. उपायुक्त डॉ. मेघना वासनकर यांच्या मार्गदर्शनाखाली अतिक्रमण विभाग व बाजार परवाना विभागाच्या विशेष पथकाने सक्करसाथ येथील शनी मंदिराजवळील जय ट्रेडर्स या दुकानावर छापा मारला. येथून सुमारे 150 किलो प्रतिबंधित प्लास्टिक कॅरीबॅग जप्त करण्यात आल्या. महापालिकेने या दुकानाला सीलही ठोकले आहे.
सहाय्यक आयुक्त नंदकिशोर तिखिले, भुषण पुसतकर, अतिक्रमण पथक प्रमुख योगेश कोल्हे, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अधिकारी प्रशांत मेहरे, स्वच्छता निरीक्षक विकी जेधे, पोलीस अधिकारी व अन्य कर्मचारी या कारवाईत सहभागी होते. राज्य शासनाने लागू केलेल्या प्लास्टिक बंदीचे उल्लंघन केल्यास संबंधितांवर कठोर कारवाई करण्यात येईल, असे महापालिकेच्या अधिकार्‍यांनी स्पष्ट केले. पर्यावरणाच्या रक्षणासाठी ही बंदी अत्यंत आवश्यक असून, नियमांचे पालन करणे सर्व नागरिकांचे कर्तव्य असल्याचे महापालिकेने म्हटले आहे.
ही प्लास्टिक बंदी केवळ व्यापार्‍यांसाठीनाही तर प्रत्येक नागरिकासाठी आहे. अमरावती शहराचे पर्यावरण व भविष्यासाठी आपण सर्वांनी एकत्र यावे, प्लास्टिकऐवजी कापडी, कागदी किंवा इतर पर्यावरणपूरक पर्यायांचा वापर करावा, असे आवाहन मनपा आयुक्त सौम्या शर्मा यांनी केले आहे. नागरिकांनी या कामात महापालिकेला मदत करावी. नियमांचे उल्लंघन करणार्‍या व्यक्तींची माहिती तात्काळ प्रशासनाला द्यावी. शहरातील प्लास्टिक वापरावर नियंत्रण ठेवण्यासाठी ही मोहीम अधिक प्रभावीपणे राबवली जाणार असून, नियम तोडणार्‍यांवर कोणतीही दयामाया दाखविली जाणार नाही, असा इशाराही प्रशासनाने दिला आहे.
-चौधरी चौकात फुल विक्रेत्यांवर कारवाई
स्वच्छ भारत अभियानांतर्गत प्लास्टिक जप्ती मोहीम सहाय्यक आयुक्त भूषण पुसदकर यांच्या मार्गदर्शनात कॉटन मार्केट, चौधरी चौक परिसरातही राबविण्यात आली. यावेळी फुल विक्रेत्यांकडून मोठ्या प्रमाणात प्लास्टिक पिशव्या जप्त करण्यात आल्या. प्लॅस्टिक पिशव्यांचा वापर टाळण्यासाठी या विक्रेत्यांना सक्त ताकीद देण्यात आली. हातगाडी धारकांना डस्टबिन ठेवण्याचे निर्देश व नोटिसा देण्यात आल्या. या कारवाईमध्ये नोडल अधिकारी विकी जेधे, जेष्ठ स्वच्छता निरीक्षक विजय बुरे, स्वच्छता निरिक्षक राजु डिक्याव सहभागी झाले होते.

संबंधित बातम्या

Back to top button