जिप आणि पंस निवडणूकरिता प्रारुप प्रभाग रचना घोषित
जिल्हाधिकारी आशिष येरेकर यांची मंजूरी

-जिल्हा परिषदेचे 59 गट राहणार
-14 पंसच्या 118 गणांची रचना
अमरावती / 14 जुलै: राज्य निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमिवर अमरावती जिल्ह्यातील जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांची प्रारुप प्रभाग रचना जाहिर करण्यात आली आहे. अमरावतीचे जिल्हाधिकारी आशिष येरेकर यांनी यासंदर्भातील प्रस्तावाला मंजूरी दिली आहे. त्यानुसार जिल्हा परिषदेचे 59 गट आणि जिल्ह्यातील 14 पंचायत समितीमधील 118 गणांच्या प्रारुप रचनेचा प्रस्ताव जिल्हा परिषद आणि पंचायत समितींच्या गटविकास अधिकारी तसेच संबंधित तहसिलदारांना पाठविण्यात आला आहे.
या प्रारुप प्रभाग रचनेचा प्रस्ताव विविध परिशिष्ठांमध्ये आणि नकाशांसह आपापल्या कार्यालयातील सूचना फलकांवर प्रकाशित करण्यात यावा, असे निर्देशही अधिकार्यांना देण्यात आले आहे. त्यामुळे मतदारांना हे हा प्रारुप प्रस्ताव संबंधित कार्यालयांमध्ये पाहता येणार आहे. यासंदर्भात घेतले जाणारे आक्षेप व सूचनांचा स्विकार करुन पुढील कार्यवाहीबाबत सुचनांची प्रतिक्षा करण्याचेही जिल्हा प्रशासनाने अधिकार्यांना सांगितले आहे.
जिल्हा परिषद निवडणुकीसंदर्भात जिल्हाधिकारी आशिष येरेकर यांनी एक परिपत्रक जारी केले आहे. त्यानुसार अमरावती जिल्हा परिषदेअंतर्गत येणार्या सर्व गटांची मिळून एकुण लोकसंख्या 18 लाख 4 हजार 514 एवढी निश्चित करण्यात आली आहे. त्यात अनूसूचित जातीचे 3 लाख 38 हजार 904, अनूसूचित जमातीचे 3 लाख 60 हजार 390 नागरिकांचा समावेश आहे. या लोकसंख्येच्या आधारावर अमरावती जिल्हा परिषदेची सदस्य संख्या 59 एवढी ठरविण्यात आली आहे. तसेच जिल्ह्यातील 14 पंचायत समितींमध्ये गण संख्या 118 एवढी कायम ठेवण्यात आली आहे.
जिल्हाधिकार्यांनी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीकरिता जारी केलेल्या परिपत्रकात तालुकानिहाय जिल्हा परिषद मतदारसंघांची घोषणा करण्यात आली आहे. सोबतच प्रत्येक गटात समाविष्ठ ग्राम पंचायत आणि गावांच्या संख्येबाबतही माहिती देण्यात आली आहे. प्रत्येक गट व गणात मतदार संख्या किती असेल, याची माहितीही सविस्तर नमूद करण्यात आली आहे.
-18 ऑगस्टला अंतिम प्रभाग रचना
प्रभाग रचना जाहिर झाल्यानंतर आता 21 जुलैपर्यंत या रचनेसंदर्भाने आक्षेप व सुचना नोंदविता येणार आहे. त्याआधारे जिल्हाधिकारी आपल्या अभिप्रायासह विभागीय आयुक्तांसमक्ष 28 जुलैपर्यंत प्रभाग रचनेचा प्रस्ताव सादर करतील. त्यानंतर 11 ऑगस्टपर्यंत विभागीय आयुक्त प्राप्त झालेले आक्षेप व सूचनांवर सुनावणी करतील व आपला निर्णय देतील. या संपूर्ण प्रक्रियेनंतर 18 ऑगस्टला जिल्हाधिकारी राज्य निवडणूक आयोग किवा आयोगाद्वारे प्राधिकृत अधिकार्यांकडे अंतिम प्रभाग रचना मान्यतेसाठी पाठवतील.
-तहसिलींना बॅलेट व कंट्रोल युनिट वितरित
प्रारुप प्रभाग रचनेची अधिसूचना जारी करण्यासोबतच जिल्हाधिकारी कार्यालयाने जिल्हा परिषद तसेच पंचायत समिती निवडणुकीसाठी तहसिल प्रशासनाला कंट्रोल आणि बॅलेट युनिट वितरित केले आहेत. तत्पूर्वी सर्व ईव्हीम यंत्रांची जिल्हा प्रशासनाने पडताळणी केली आहे. यासंदर्भाने तहसिल प्रशासनातील प्रमुख अधिकार्यांनाही प्रशिक्षण व मार्गदर्शन करण्यात आले आहे.
-युनिटचे याप्रमाणे झाले वाटप
तहसिल प्रशासनाला पुढीलप्रमाणे युनिटचे वाटप करण्यात आले : धारणी : 219 कंट्रोल व 220 बॅलेट युनिट, चिखलदरा : 34 कंट्रोल युनिट, अंजनगाव सुर्जी : 133 कंट्रोल व 133 बॅलेट युनिट, अचलपूर : 232 कंट्रोल व 232 बॅलेट युनिट, मोर्शी : 88 कंट्रोल व 38 बॅलेट युनिट, वरुड : 125 कंट्रोल व 57 बॅलेट युनिट, तिवसा : 120 कंट्रोल व 120 बॅलेट युनिट, अमरावती : 178 कंट्रोल व 178 बॅलेट युनिट, भातकुली : 137 कंट्रोल व 137 बॅलेट युनिट, दर्यापूर : 163 कंट्रोल व 163 बॅलेट युनिट, नांदगाव खंडेश्वर : 170 कंट्रोल व 170 बॅलेट युनिट, चांदुर रेल्वे : 30 कंट्रोल व 34 बॅलेट युनिट, धामणगाव रेल्वे 113 कंट्रोल व 113 बॅलेट युनिट. अशाप्रकारे एकुण 1962 कंट्रोल व 1815 बॅलेट युनिटचे वाटप तहसिल प्रशासनाला करण्यात आले.




