कारागृहाच्या खेळाडूंनी नागपुरात मारली बाजी

विभागीय क्रीडा स्पर्धेत पदकांचा पाऊस

* अमरावतीचा संघ राज्यात भिडणार

अमरावती/9 फेब्रुवारी – जिद्द आणि शिस्तीच्या बळावर अमरावती मध्यवर्ती कारागृहाच्या खेळाडूंनी नागपूर येथील विभागीय वार्षिक क्रीडा स्पर्धेत अचाट कामगिरी करत संपूर्ण विभागात द्वितीय क्रमांक पटकावला आहे. अधीक्षक श्रीमती कीर्ती चिंतामणी यांच्या मार्गदर्शनात महिला व्हॉलीबॉल संघाने सुवर्ण तर पुरुष बास्केटबॉल संघाने रौप्य पदक जिंकून अमरावतीचा डंका वाजवला. 3 ते 5 फेब्रुवारी 2026 दरम्यान नागपूर येथे पार पडलेल्या या स्पर्धेत 11 कारागृहांच्या चुरशीमध्ये अमरावतीच्या 32 शिलेदारांनी पदकांची लयलूट केली.
पोलीस आयुक्त रवींद्र सिंघल यांच्या हस्ते उद्घाटन झालेल्या या स्पर्धेत अमरावतीच्या महिला संघाने प्रतिस्पर्ध्यांना धूळ चारली. यामध्ये सारिका बावनकर, प्रीती नाईक, शुभांगी वांढे, शिवानी जुन्नघरे, जया ठाकरे आणि बबिता धुमाळे यांनी सुवर्ण यश मिळवले. बास्केटबॉलमध्ये राहुल पंधरे, अनिश हरणे, सागर गाडगे, आशिष घोडेस्वार, आकाश नागरगोजे, अक्षय गायकवाड, मंगेश सोळंके, विकास कोसे, शाहरुख खान आणि महादेव शिंदे यांनी चिवट झुंज दिली. वैयक्तिक स्पर्धेत अक्षय गायकवाड, सुनील फुफरे आणि सारिका बावनकर यांनी सुवर्ण पदके जिंकली. रोहिणी हातझडे, गणेश टोंगे, ईश्वर डाहणे, किरण नागरे, पंकज पारखी आणि आनंद पाटील यांनी धावण्याच्या शर्यतीत रौप्य पदके मिळवली. कराटे व कुस्तीमध्ये आशिष शिंगणे, विपीन राठोड, अनिश हरणे आणि ललित मुंडे यांनी पदके पटकावली. प्रशिक्षक देवराव जाधव व ललित मुंडे यांच्या मेहनतीमुळे हे यश मिळाले असून हे सर्व खेळाडू आता राज्यस्तरावर खेळण्यासाठी पुणे येथे रवाना होणार आहेत.

संबंधित बातम्या

Back to top button