1 ते 7 ऑगस्ट दरम्यान राज्यात महसूल सप्ताह

राज्य सरकारचा निर्णय

-मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची माहिती
मुंबई / 30 जुलै : 1 ऑगस्ट हा दिवस राज्यभरात ‘महसूल दिन’ म्हणून साजरा करण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतला आहे. 1 ऑगस्ट ते 7 ऑगस्ट हा पूर्णपणे आठवडा ‘महसूल सप्ताह’ साजरा करण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतल्याची माहिती महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली आहे. महसूल विभागानं जिल्हास्तरीय महसुली कामं वेळेच्या वेळी पूर्ण करून त्यानुसार अभिलेख अद्यावत करणं, वसुलीच्या नोटीस पाठवणं, मोजणी करणं, अपिल प्रकरणांची चौकशी करणं, महसुली वसुलीचं उद्दिष्ट पार करणं आणि कामं वेळेच्या वेळी करणार्‍या अधिकारी आणि कर्मचार्‍यांचा सत्कार करणं, आदी कामं या सप्ताहात करण्यात येणार आहेत.
महसूल विभागानं केलेल्या कामकाजाचा आढावा जनतेसमोर ठेवण्यासाठी दरवर्षी एक ऑगस्ट हा दिवस ‘महसूल दिन’ म्हणून साजरा करण्यात येणार असल्याची माहितीही मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिलेल्या माहितीनुसार, या महसूल सप्ताहात महसूल विभागाशी संबंधित सर्वांनाच या अभियानात आपला सहभाग नोंदवणं अनिवार्य करण्यात आलं आहे. या सप्ताहाच्या पहिल्याच दिवशी निवृत्त अधिकार्‍यांच्या अनुभवाचा वापर करून 2047 च्या विकसित महाराष्ट्राच्या दृष्टीनं कोणते कायदे आणि त्यातील कोणत्या नियमात बदल केले पाहिजेत, यावर मार्गदर्शन घेतलं जाणार आहे, अशी माहिती मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली.
महसूल सप्ताहाच्या दुसर्‍या दिवशी, शासकीय जागेवर सन 2011 पासून रहिवासी प्रयोजनार्थ (घर बांधून राहणे) अतिक्रमण असलेल्या कुटुंबांपैकी अतिक्रमण नियमानुकूल करण्यास पात्र असलेल्या कुटुंबांना अतिक्रमित जागांचे पट्टेवाटप करण्याचा कार्यक्रम घेण्यात येणार असल्याची माहिती चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली. सरकारी जागेवर अतिक्रमण करून राहत असलेल्या नागरिकांना प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत लाभ देण्यात येणार आहे. संपूर्ण राज्यात 30 लाख परिवार सरकारी जागेवर राहत असल्याची माहिती मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली आहे.
या सप्ताहाच्या तिसर्‍या दिवशी शिवार रस्ते पाणंद मोजणी करून अतिक्रमण असल्यास हे रस्ते अतिक्रमण मुक्त करून त्यांच्या दुतर्फा झाडं लावण्यात येणार असल्याची माहिती चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली आहे. याच पाणंद, शिवार रस्ते करण्याकरता कलम 143 अंतर्गत जिल्हाधिकारी तहसीलदारांना विशेष अधिकार देण्यात आले आहेत. या विशेष अधिकारांचा काही अधिकार्‍यांनी गैरफायदा घेतल्याचं आणि मनमानी केल्याचं निदर्शनास आलं आहे. अनेक शेतकर्‍यांच्या सुपिक लागवडीखालील जमिनीतून या अधिकार्‍यांनी मनमानी करत रस्त्या नेल्याची बाब निदर्शनास आली आहे. राज्यात अशा 11 हजार केसेस आपल्यासमोर आल्याची माहिती मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली. यावर ज्या अधिकार्‍यांनी कलम 143 वापरताना चूक केली असेल आणि त्यातून जेवढा त्रास एखाद्या शेतकर्‍याच्या आयुष्यात होईल, तितकाच त्रास या अधिकार्‍यांच्या आयुष्यात होईल अशी प्रतिक्रिया मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली आहे.
अभियानाच्या चौथ्या दिवशी छत्रपती शिवाजी महाराज स्वराज्य अभियान राबवण्यात येणार आहे. पाचव्या दिवशी विशेष योजनेतील डीबीटी न झालेल्या लाभार्थ्यांची घरभेटी घेऊन त्यांना डीबीटी करून दिली जाणार असल्याची माहिती मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली. या सप्ताहाचा सहावा दिवस महत्त्वाचा असून, सप्ताहाच्या सहाव्या दिवशी शासकीय जमिनीवरील अतिक्रमणं निष्कषित करून शर्तभंग झालेल्या जमिनी बाबत निर्णय घेण्यात येणार असल्याचं बावनकुळे यांनी सांगितलं.
ज्या व्यक्तीला सरकारी जागा विधायक कामांसाठी दिली आहे, अशा जागा भलत्याच कामासाठी वापरल्या जात असल्याची बाब निदर्शनास आल्याचं बावनकुळे यांनी सांगितलं. काही ठिकाणी एखाद्याला शासकीय जागेवर रुग्णालय किंवा शाळा किंवा अन्य काही समाज उपयोगी कामासाठी ती जागा दिलेल्या आहेत. मात्र, तिथे सदर व्यक्ती राहत असल्याचं तर काही ठिकाणी गाड्यांचे शोरूम किंवा गॅरेज सुरू केल्याचं दिसून आलं आहे. याची आजही कारवाई झाली असून, रामटेक इथं आज तीन दर्गे पाडल्याची माहिती बावनकुळे यांनी दिली आहे.

संबंधित बातम्या

Back to top button