भाड्याच्या आस्थापनेवरील 56 टक्के कर आकारणी जाचक

मनपाने कर 15 ते 20 टक्क्यांवर आणावा

-माजी नगरसेवक संजय अग्रवाल यांची मागणी
अमरावती/ 26 जून : अमरावती शहरातील भाडेतत्वावर दिलेल्या आस्थापनांवर महापालिकेकडून 56 टक्के कराची आकारणी केली जात असून हा कर मालमत्ताधारकांसाठी जाचक ठरत आहे. यातून मालमत्ताधारकांना दिलासा देण्यासाठी संबंधित आस्थापनांवरील कर 56 टक्क्यांवरुन 15 ते 20 टक्क्यांवर आणण्यात यावा, अशी मागणी अमरावती महापालिकेतील माजी विरोधी पक्ष नेते व माजी नगरसेवक संयज अग्रवाल यांनी महापालिका आयुक्त सौम्या शर्मा यांच्याकडे एका निवेदनाद्वारे केली आहे.
अमरावती शहरात अनेक मालमत्ताधारक असे आहेत की, त्यांनी आपल्या मालकीच्या आस्थापना भाडेतत्वावर दिल्या आहेत. त्यांना भाड्यातून प्राप्त होणार्‍या उत्पन्नावर महापालिका थेट 56 टक्के कर आकारणी करते. एवढ्या मोठ्या प्रमाणात कर वसुल केला जाणे हे मालमत्ताधारकांसाठी जाचक ठरत आहे. अनेक मालमत्ताधारक कर भरणे टाळतात. त्यासाठी पळवाटा शोधल्या जात आहेत. मालमत्तेचे दोन करारनामे करुन कर भरण्याकडे अनेकांचा कल असतो. त्याचा विपरित परिणाम महापालिकेच्या उत्पन्नावरही पडत आहे. मालमत्ताधारकांना दिलासा मिळावा आणि महापालिकेलाही लाभ व्हावा, यासाठी हा कर 56 टक्क्यांवरुन 15 ते 20 टक्क्यांवर आणणे आवश्यक असल्याचे संजय अग्रवाल यांनी निवेदनात म्हटले आहे.
2014-15 मध्ये देवेंद्र फडणवीस हेच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असताना त्यांनी या विषयावर विभागीय आयुक्तांशी बैठकीत चर्चा केली होती. तत्कालिन मनपा आयुक्त पवार आणि महापालिकेतील वरिष्ठ पदाधिकारी त्यावेळी उपस्थित होते. महापालिकेने शहरातील भाड्याच्या अस्थापनांवरील कर 15 ते 20 टक्क्यांवर आणण्यासाठी ठराव पारित करुन घेण्याचा निर्णय घेण्यात आला होता. मात्र राजकिय कारणांमुळे तेव्हा हा विषय थंडबस्त्यात पडला होता, असे अग्रवाल यांनी निवेदनातून निदर्शनास आणून दिले आहे. सध्या महापालिकेत कोणतीही समिती अस्तित्वात नाही. सर्व अधिकार प्रशासनाकडे आहे. तेव्हा महापालिका आयुक्तांनी स्वत:च्या अधिकारात सदर ठराव मंजुरीकरिता शासनाला पाठवावा, अशी मागणी संजय अग्रवाल यांनी निवेदनातून केली आहे.

संबंधित बातम्या

Back to top button