विधानपरिषदेच्या उपसभापतीपदी आ.बच्चू कडूंची निवड होणार?
एकनाथ शिंदेंकडून मोठं गिफ्ट मिळणार

मुंबई /24 जून- गेल्या काही दिवसांत राज्याच्या राजकीय वर्तुळात प्रचंड घडामोडी घडल्या आहेत. विधानपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आमदार बच्चू कडू यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पक्षात प्रवेश केल्याने राजकीय समीकरणे बदलली आहेत. दुसरीकडे, उद्धव ठाकरे यांच्या पक्षात दुसर्यांदा मोठी फूट पडल्याचे पाहायला मिळत असून, त्यांच्या सहा खासदारांनी बंड पुकारले आहे.
या सर्व वादळी घडामोडींच्या पार्श्वभूमीवर सध्या राज्याचे पावसाळी अधिवेशन सुरू आहे. या अधिवेशनात शेतकरी कर्जमाफी, पिकांचे झालेले नुकसान, पावसाची ओढ, आणि राज्यातील कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न यांवरून विरोधक आक्रमक झाले असून त्यांनी सत्ताधार्यांना कोंडीत पकडण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. याच गदारोळात पावसाळी अधिवेशनात विधानपरिषदेच्या उपसभापतीपदाची निवड होण्याची दाट शक्यता वर्तवली जात होती. मात्र, आता या संदर्भात एक मोठी आणि महत्त्वाची माहिती समोर आली असून, चालू पावसाळी अधिवेशनात उपसभापतींची निवड होणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे. विधानपरिषदेचे उपसभापतीपद सध्या एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडे आहे. यापूर्वी हे पद भूषवणार्या नीलम गोर्हे यांचा कार्यकाळ संपल्यामुळे सध्या हे पद रिक्त आहे. शिंदे गटाने नीलम गोर्हे यांना पुन्हा एकदा विधानपरिषदेवर आमदारकी दिली असल्याने, उपसभापतीपदासाठी त्यांच्याच नावाची पुन्हा चर्चा सुरू होती. मात्र, आता या पदासाठी पक्षांतर्गत इतर नावांचीही चाचपणी सुरू असल्याचे समजते. यामध्ये नुकतेच शिंदे गटात सामील झालेले आमदार बच्चू कडू आणि नंदुरबारचे विधानपरिषद आमदार चंद्रकांत रघुवंशी यांच्या नावांची जोरदार चर्चा सुरू आहे. नीलम गोर्हे यांच्याऐवजी या दोन्ही नेत्यांपैकी कोणा एकाला संधी दिली जाण्याची शक्यता सूत्रांनी वर्तवली आहे.
उपसभापती निवडीसाठी बोलावणार एकदिवसीय विशेष अधिवेशन
सध्या सुरू असलेल्या पावसाळी अधिवेशनात विरोधक विविध मुद्द्यांवरून आक्रमक असल्यामुळे, सत्ताधार्यांनी या अधिवेशनात ही निवडणूक न घेण्याचा निर्णय घेतल्याची माहिती आहे. शिवसेनेच्या कोट्यात असलेल्या या महत्त्वाच्या पदाचा निर्णय घेण्यासाठी घाईगडबड न करता, चालू अधिवेशन संपल्यानंतर एक विशेष एकदिवसीय अधिवेशन बोलावले जाण्याची शक्यता आहे. या विशेष अधिवेशनातच उपसभापतीपदाची निवडणूक प्रक्रिया पार पाडली जाईल, असे सूत्रांकडून समजते.




