महाराष्ट्राच्या मनात काय? ते निवडणुकीनंतर कळेल

राज-उद्धव भेटीवर फडणवीसांची प्रतिक्रिया

मुंबई / 27 जुलै : जवळपास महिनाभरापूर्वी हिंदी सक्तीचा जीआर रद्द केल्यानंतर विजयी मेळाव्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेना प्रमुख राज ठाकरे आणि शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे हे एकत्र आले होते. महत्त्वाचे म्हणजे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी दोन्ही पक्षांमध्ये युती होईल, अशी राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे. अशातच आज (27 जुलै) उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त राज ठाकरे हे मातोश्री निवास्थस्थानी भेटायला गेले होते. यावर आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
माध्यमांशी संवाद साधताना देवेंद्र फडणवीस यांना राज ठाकरे हे मातोश्रीवर उद्धव ठाकरेंच्या भेटीसाठी गेल्यासंदर्भात प्रश्न विचारण्यात आला. यावर ते म्हणाले की, उद्धव ठाकरे यांचा वाढदिवस आहे, त्यामुळे त्यांना शुभेच्छा देण्यासाठी जर राज ठाकरे मातोश्रीवर गेले असतील, तर ही आनंदाची गोष्ट आहे. त्यामुळे मला असं वाटतं की, यामध्ये आपण राजकारण का आणायचं? राज ठाकरे हे उद्धव ठाकरेंना शुभेच्छा देण्यासाठी गेले होते. उद्धव ठाकरे यांना आमच्याही शुभेच्छा आहेत. वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी जाणं यात राजकारण आणायचं काही कारण नाही, अशी भूमिका देवेंद्र फडणवीस यांनी मांडली.
सुरुवातीपासूनच बोललं जातंय की, महाराष्ट्राच्या मनात जे आहे तेच होईल, असा प्रश्न विचारला असता देवेंद्र फडणवीस म्हणाले की, महाराष्ट्राच्या मनात काय आहे, हे तुम्हाला विधानसभेच्या निवडणुकीत दिसलं आहे. त्यामुळे आता महाराष्ट्राच्या मनात काय आहे, हे तुम्हाला आगामी स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकांमध्येही दिसेल. मात्र, काही पक्षांच्या नेत्यांच्या मनात जे काही आहे, ते महाराष्ट्राच्या मनातील आहे, असं म्हणणं काही योग्य होणार नाही, अन्यथा ते मोठं विधान होईल, अशी प्रतिक्रिया देवेंद्र फडणवीस यांनी दिली.

संबंधित बातम्या

Back to top button