भिवंडीतून तीन संशयित दहशतवाद्यांना अटक

3 लाख रुपये पॅलेस्टाइनला पाठवल्याचा आरोप

* उत्तर प्रदेश एटीएस पथकाची कारवाई

ठाणे /21 सप्टेंबर :  उत्तर प्रदेश दहशतवाद विरोधी पथकाने (यूपी एटीएस) शनिवारी उशिरापर्यंत छापेमारी करत भिवंडीतील विविध भागातून तीन तरुणांना अटक केली. या तरुणांनी अंदाजे 3 लाख रुपये गोळा करून ती रक्कम फिलिस्तीन देशात पाठवल्याचा आरोप आहे. खळबळजनक म्हणजे या तिघांवर संशयास्पद दहशतवादी कारवायांमध्ये सहभाग असल्याचा संशय असून तपास यंत्रणांकडून त्यांची कसून चौकशी केली जात आहे. मोहम्मद अयान मोहम्मद हुसेन (22 वर्षे), रा. सहारा अपार्टमेंट्स, ताहेरा मॅरेज हॉलजवळ, भिवंडी; अबू सुफियान तजम्मुल अन्सारी (22 वर्षे), रा. गुलजार नगर, भिवंडी; जैद नोटियार अब्दुल कादिर (22 वर्षे), रा. वेताळ पाडा, भिवंडी, अशी अटक केलेल्या तरुणांची नावे आहेत. एटीएस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, उत्तर प्रदेश दहशतवाद विरोधी पथकाला माहिती मिळाली होती की, 27 ऑगस्टच्या तपासात भिवंडीतून उत्तरप्रदेश राज्यात लाखोंची रक्कम फिलिस्तीन देशात पाठवली जात असल्याचे समोर आले. त्यानंतर यूपी एटीएसचे एक पथक शुक्रवारी भिवंडीत दाखल होऊन तपास सुरू केला असता, दिवसभर या तरुणावर पळत ठेवून शनिवारी दुपारच्या सुमारास भिवंडी शहरातील गुलजार नगर भागातील एका इमारतीत पथकाने अचानक छापेमारी करत अबू सुफियान तजम्मुल अन्सारी या तरुणाला राहत्या घरातून ताब्यात घेतलं. त्यानंतर त्याच्याकडे चौकशी केली असता त्याने इतर दोन साथीदार मोहम्मद अयान मोहम्मद हुसेन आणि जैद नोटियार अब्दुल कादिर याब दोघांची नावे सांगितल्यावर पथकाने दोघांनाही शांतीनगर आणि निज्मापुरा पोलिसांच्या मदतीने ताब्यात घेऊन पोलीस ठाण्यात आणले आणि त्यांच्यावर दहशतवाद्यांना रक्कम गोळा करून पाठवत असल्याचा आरोप करत गुन्हा दाखल केला आहे. उत्तर प्रदेश दहशतवाद विरोधी पथकाने शनिवारी रात्री उशिरा या तिघांनाही पुढील तपासासाठी लखनौच्या एटीएस कार्यलयात नेले, अशी माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक विनायक गायकवाड यांनी दिली. धक्कादायक बाब म्हणजे अंबरनाथ तालुक्यात नेवाळी नाका परिसरामधून आफताब कुरेशी या संशयित दहशतवाद्याला दिल्ली पोलिसांनी गेल्याच आठवड्यात अटक केली होती. त्यावेळीही स्थानिक हिल लाईन पोलिसांकडून आफताबचे घर शोधून काढण्याचा प्रयत्न केला गेला आणि त्याला अटक करून दिल्लीत पुढील तपासासाठी नेण्यात आले. आता त्या पाठोपाठ भिवंडीतील या तिघांवर देशविघातक संशयास्पद कारवायांमध्ये सहभाग असल्याचा संशय आहे, आणि तपास यंत्रणांकडून त्यांची कसून चौकशी केली जात आहे.

संबंधित बातम्या

Back to top button