मते चोरून सत्तेत आलेल्यांनीच जमीन चोरली
पार्थ पवार भूखंड खरेदी प्रकरणावरून राहूल गांधींचा घणाघात

* महायुती सरकारवर निशाणा
मुंबई/7 नोव्हेंबर – ज्यांनी जमीन चोरली आहे, ते मते चोरूनच सत्तेत आले आहेत. मोदीजी गप्प आहेत आणि त्यांचे मौन बरंच काही सांगून जात आहे.
कारण लुटारूंच्या पाठिंब्यावरच त्यांचं सरकार टिकलेले आहे, असे म्हणत विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी महायुती सरकार आणि पंतप्रधानांवर टीकास्त्र डागले. पार्थ पवार यांच्या कंपनीने खरेदी केलेल्या जमीन प्रकरणावरून त्यांनी महायुती सरकारवर निशाणा साधला. राहुल गांधी यांनी पार्थ पवार यांच्या कंपनीने खरेदी केलेल्या भूखंड प्रकरणाबद्दल एक पोस्ट केली आहे. ते म्हणाले, महाराष्ट्रामध्ये 1800 कोटी रुपयांची शासकीय जमीन, जी मागासवर्गीयांसाठी राखीव होती, ती फक्त 300 कोटी रुपयांमध्ये मंत्र्याच्या मुलाला विकण्यात आली. त्यात मुद्रांक शुल्कही माफ करण्यात आले. म्हणजे एक तर लूटही केली आणि त्यावर कायदेशीर करण्यातही सूट देण्यात आली, असे राहुल गांधी म्हणाले. ही जमीन चोरी त्या सरकारने केली आहे, जे मत चोरी करून सत्तेत आले आहे. त्यांना माहिती आहे की, कितीही लुटले तर मते चोरून पुन्हा सत्तेत येता येणार आहे. ना लोकशाहीची काळजी आहे, ना जनतेची; ना मागासवर्गीयांच्या अधिकारांची, अशी टीका राहुल गांधींनी यांनी भूखंड घोटाळ्यावर केली.




