शेतकरी कर्जमुक्तीची तिसरी यादी जाहीर

साडेतीन लाख शेतकर्‍यांना थेट लाभ

मुंबई /12 ऑक्टोबर  : राज्यातील थकबाकीदार शेतकरी बांधवांसाठी एक अत्यंत दिलासादायक आणि महत्त्वाची बातमी समोर आली आहे. ’पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना 2026’ अंतर्गत पात्र लाभार्थी शेतकर्‍यांची तिसरी यादी 12 ऑक्टोबर 2026 रोजी अधिकृतपणे जाहीर करण्यात आली आहे.
या तिसर्‍या यादीमध्ये राज्यातील 3 लाख 51 हजार 192 शेतकर्‍यांचा समावेश करण्यात आला आहे. या सर्व पात्र शेतकर्‍यांनी आपल्या कर्जखात्याची थकबाकी तपासून तातडीने नजीकच्या ’आपले सेवा केंद्रावर’ जाऊन आधार प्रमाणीकरण पूर्ण करून घ्यावे आणि कर्जमुक्तीचा लाभ घ्यावा, असे आवाहन राज्याचे सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनी केले आहे.’पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना 2026’ च्या निकषांनुसार राज्यातील शेतकर्‍यांना मोठा दिलासा देण्यात येत आहे.
कर्जमुक्तीची मर्यादा: 2 लाख रुपयांपर्यंतच्या थकीत पीककर्जांसह पुनर्गठित व फेरपुनर्गठित कर्जांना या योजनेअंतर्गत संपूर्ण कर्जमुक्तीचा लाभ दिला जात आहे.
व्याजमाफीचा दिलासा: 1 एप्रिल 2026 पासूनचे पुढील व्याज व इतर खर्च पूर्णपणे माफ करण्यात येणार आहेत.
या योजनेअंतर्गत पोर्टलवर बँकांनी एकूण 31.17 लाख थकीत कर्जखात्यांची माहिती अपलोड केली होती. महाआयटीद्वारे चालवल्या जाणार्‍या संगणकीय प्रणालीद्वारे आतापर्यंत एकूण 24.67 लाख लाभार्थी शेतकर्‍यांच्या याद्या प्रसिद्ध करण्यात आल्या आहेत.
तिसर्‍या यादीतील पात्र शेतकर्‍यांची जिल्हा निहाय यादी संबंधित बँक शाखा, विविध कार्यकारी विकास संस्था आणि ग्रामपंचायतींमध्ये प्रसिद्ध करण्यात आली आहे.

Back to top button