…तर मुख्यमंत्र्यांनी गृहमंत्री पदाचा राजीनामा द्यावा

प्रदेश काँग्रेस हर्षवर्धन सपकाळ यांचा मुख्यमंत्र्यांवर प्रहार

मुंबई /24 ऑक्टोबर – सातारा जिल्ह्यातील फलटण उपजिल्हा रुग्णालयातील एका महिला डॉक्टरला पोलिसांच्या अनन्वीत छळाला कंटाळून आत्महत्या करावी लागली, ही घटना पोलीस विभागाला लाज आणणारी असून, गृहविभागावर फडणवीस यांचे नियंत्रण नसल्याचे दर्शवते. सदर घटना गृहविभागाच्या अब्रुची लक्तरे वेशीवर टांगणारी असल्याने गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना जनाची नाही तर मनाची तरी थोडी लाज असल्यास त्यांनी तात्काळ गृहमंत्रीपदाचा राजीनामा देऊन राज्याला पूर्णवेळ गृहमंत्री देणे आवश्यक आहे, अशी मागणी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्ष वर्धन सपकाळ यांनी शुक्रवारी केली. सातारा जिल्ह्यातील घटनेप्रकरणी भाजपा महायुती सरकार व गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा सपकाळ यांनी खरखुरेपणे समाचार घेत म्हणाले की, “सदरक्षणाय खलनिग्रहणाय” हे महाराष्ट्र पोलिसांचे ब्रीदवाक्य असून त्याचा अर्थ सज्जनांचे रक्षण करणे आणि दुर्जनांचा नाश करणे होय. मात्र आपल्या पोलीसांमध्ये गुंड, मवाली, बलात्कारी अशा दुर्जन प्रवृत्तींना मोकाट सोडून सज्जनांना त्रास देण्याची प्रवृत्ती बळावत आहे आणि त्याचे सर्वस्वी जबाबदार फडणवीस आहेत. अशा पोलिस विभागाच्या कारभारावर फडणवीस यांना लाज वाटली पाहिजे, पण घटना कितीही गंभीर घडली तरी त्यांचे काहीही वाटत नाही. फलटणची घटना ही पहिली नसून, याआधी स्वारगेट बस स्थानकात एसटी बसमध्ये एका महिलेवर बलात्कार झाला, त्यावेळी गृहराज्यमंत्र्यांनी केलेले विधान निर्लज्जतेचे शिखर होते. रावेरमध्ये केंद्रीय मंत्र्याच्या मुलीची छेड झाली, पण कारवाई होत नाही हे पाहून मंत्र्यालाच पोलिस स्टेशनमध्ये धरणे-धरावे लागले. अशी परिस्थिती महाराष्ट्राला फडणवीस यांनी दिली आहे. मात्र आता ते सारवासारव करणार, असे त्यांचे वर्तन राहील, परंतु जर ते खरेच धर्माला मानत असतील, तर फलटणच्या घटनेतील नराधमांच्या मुसक्या आवळाव्यात, असे खुले आव्हान सपकाळ यांनी दिले.

संबंधित बातम्या

Back to top button