दिवाळीपुर्वी शेतकर्यांना मदतीची रक्कम खात्यावर जमा होणार
उपमुख्यमंत्री अजित पवार यांची माहिती

पुणे/12 ऑक्टोबर – अतिवृष्टीने नुकसान झालेल्या राज्यातील शेतकर्यांच्या मदतीसाठी राज्य सरकारने पॅकेज चार दिवसापूर्वी जाहीर केले असून शेतकर्यांचे लक्ष आता मदत कधी मिळेल याकडे लागले होते. त्यातच पुण्यातील साखर संकुलात झालेल्या बैठकीनंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शेतकर्यांना दिल्या जाणार्या मदतीविषयी थेट माहिती दिली. राज्यातील पूरग्रस्त शेतकर्यांना दिवाळीपूर्वी मदत देण्याचा प्रयत्न असून, त्यांनी सांगितले की उद्या ते मुंबईला जाऊन राज्याच्या मुख्य सचिवांसोबत चर्चा करतील आणि ज्या जिल्ह्यांत पूरपरिस्थिती निर्माण झाली होती तिथल्या शेतकर्यांचे अहवाल प्राप्त होताच निधी डीबीटीद्वारे थेट खात्यात जमा केला जाईल. पुण्यातील व्हीएसआय येथे झालेल्या बैठकीनंतर प्रसार माध्यमाशी संवाद साधताना त्यांनी साखर कारखानदारीतील डिस्टिलरी, को-जन आणि सौरऊर्जेसंबंधी समस्यांवर चर्चा झाली असल्याचे स्पष्ट केले. कृषी क्षेत्रात कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करण्यावर भर देण्यात आला असून, त्यामुळे शेतकर्यांना प्रति हेक्टरी २५ हजार रुपये प्रोत्साहन दिले जाईल. तसेच, रोपांची किंमत तीन रुपयांवरून दोन रुपये करण्यात आली असून, प्रति रोपाला एक रुपया प्रोत्साहन म्हणून दिला जाईल. ही योजना फर्स्ट कम फर्स्ट तत्त्वावर पाच हजार शेतकर्यांसाठी लागू असेल, असे त्यांनी सांगितले.




