ठाकरे बंधू पाच महापालिका एकत्र लढणार

संजय राउत यांची माहिती

मुंबई /6 ऑक्टोबर : आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी महायुती आणि महाविकास आघाडीने मोर्चेबांधणीला सुरुवात केली आहे. दुसरीकडे, शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे देखील पालिका निवडणुकीसाठी एकत्र येत असल्याचे दिसत आहे. महत्त्वाचे म्हणजे, गेल्या तीन महिन्यांत दोन्ही ठाकरे बंधूंनी पाच वेळा एकमेकांची भेट घेतली आहे. अशातच शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी दावा केला की दोन्ही ठाकरे बंधूंमध्ये काही महापालिकांमध्ये एकत्र लढण्याबाबत एकमत झाले आहे.

महापालिका निवडणुकीत राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांचं किती ठिकाणी एकमत झालं आहे, असा प्रश्न विचारला असता, संजय राऊत म्हणाले की ठाणे, कल्याण-दांडे, नाशिक या महापालिकांमध्ये मनसे आणि शिवसेना यांच्यात एकमत झाले आहे. तथापि, इतर अनेक महानगरपालिका आणि भागांमध्ये शिवसेना तर आहेच, पण मनसे देखील आहे. काही ठिकाणी राष्ट्रवादीची ताकद आहे तर काही ठिकाणी काँग्रेसची ताकद आहे, त्यामुळे या सर्व गोष्टींचा विचार पुढील निवडणुकीसाठी करावा लागेल, असे राऊत यांनी स्पष्ट केले.

महाविकास आघाडीने राज ठाकरेंसाठी दरवाजे उघड आहेत का, असा प्रश्न विचारला असता, संजय राऊत म्हणाले की महाराष्ट्रात महाविकास आघाडी असून त्यात शिवसेना प्रमुख पक्ष आहे. जर महाविकास आघाडीत नवा पक्ष येणार असेल, तर त्याचा विचार केला जाईल. स्थानिक स्वराज्य संस्थांसाठी वेगळं गणित लक्षात घेऊन निर्णय घेण्यात येईल. महाविकास आघाडीचे दरवाजे खुले आहेत, हे राज ठाकरेंना सांगण्याचा अधिकार माझा एकट्याचा नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले. संजय राऊत यांनी म्हटले की, महाविकास आघाडीत तीन पक्ष आहेत, शिवसेना आणि मनसेच्या चर्चा सुरू आहेत, तसेच मविआशी आमचे उत्तम संबंध असून, मविआच्या नेत्यांचे राज ठाकरेंशी चांगले संबंध आहेत. असा दावाही संजय राऊत यांनी केला.

संबंधित बातम्या

Back to top button