आज ठाकरे बंधूंचा मुंबईत ऐतिहासिक मेळावा

20 वर्षानंतर एकत्रित गर्जना

-राजकीय युती होणार का?
-अवघ्या महाराष्ट्राचे लक्ष
मुंबई / 4 जुलै: महाराष्ट्रात पहिलीपासून हिंदी भाषा सक्तीच्या विरोधातील आंदोलन यशस्वी ठरल्यानं विजयाची सभा उद्या वरळीच्या ’एनएससीआय डोम’ या सभागृहात पार पडणार आहे. ही सभा ऐतिहासिक ठरणार आहे, कारण तब्बल वीस वर्षांनंतर दोघे ठाकरे बंधू एकाच व्यासपीठावर येणार आहेत. इतकंच नव्हे तर दोन्ही ठाकरेंची एकत्र भाषणंही होणार आहेत. विशेष म्हणजे दोन्ही ठाकरे एकत्र येणार असल्यानं शिवसैनिक आणि मनसैनिक अशा दोन्ही कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड उत्साह असून दुसरीकडं सामान्य मराठी माणसाचं देखील या सभेकडं लक्ष लागून राहिलं आहे.
मराठीच्या मुद्द्यावरुन एकत्र येणार्‍या या दोन्ही भावांमुळं राज्यात काही नवी राजकीय समिकरणं तयार होतात का? याबाबत उद्याच्या सभेत काही घोषणा होतेय का? याकडंही सर्वांच्या नजरा लागून राहिल्या आहेत. केवळ सर्वसामान्यांच्याच नव्हे तर सत्ताधारी पक्षांच्या देखील याकडं नजरा असतील. उद्याच्या सभेचं आयोजन हे ठाकरेंची शिवसेना आणि ठाकरेंची मनसे या दोन पक्षांकडून करण्यात आलं आहे. मनसेच्यावतीनं या विजयी मेळाव्याच्या निमंत्रणासाठी सोशल मीडियावरुन प्रसिद्ध केलेल्या पोस्टरमध्ये निमंत्रक म्हणून राज ठाकरे-उद्धव ठाकरे असा उल्लेख करण्यात आला होता.
पण महत्वाचं म्हणजे यामध्ये मराठी जनांना सभेला येण्यासाठी ज्या पद्धतीनं आवाहन करण्यात आलं आहे. त्यात म्हटलं आहे की, हिंदीच्या मुद्द्यांवरुन तुम्ही सरकारला नमवलं आहे. मराठी जनांनी नमवलं आहे. आम्ही फक्त तुमच्यावतीनं संघर्ष करत होतो. त्यामुळं हा आनंद साजरा करतानासुद्धा आम्ही फक्त या मेळाव्याचे आयोजक आहोत, बाकी जल्लोष तुम्हीच करायचा आहे. वाजत गाजत या, जल्लोषात या, गुलाल उधळत या!! आम्ही वाट पाहतोय…! जर उद्याच्या मेळाव्यात शिवसेना आणि मनसे एकत्र येऊन आगामी महापालिका निवडणूक लढवणार असल्याची घोषणा होऊ शकते. सर्वात श्रीमंत अशा मुंबई महापालिकेची निवडणूक आणि मराठी माणूस असं समीकरण जर या दोन्ही भावांनी जुळवण्याचा प्रयत्न केला, त्यासाठी एकत्र येत असल्याची घोषणा केली तर महाराष्ट्रात नवं राजकीय समीकरण जुळून येईल आणि नव्या राजकारणाला देखील सुरुवात होऊ शकते.
-काँग्रेस-राष्ट्रवादीची दांडी मारणार?
हिंदीसक्तीच्या मुद्द्यावर सत्ताधार्‍यांविरोधात सर्वच विरोधकांनी एकत्रित एल्गार पुकारलाय. मराठीसाठी अनेक संघटनाही रस्त्यावर उतरल्या. त्यामुळे ठाकरेंच्या मेळाव्यात मराठीसाठी झटणार्‍या संघटनांसह विरोधीपक्षही सहभागी होईल, अशी आशा होती. मात्र काँग्रेस आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते या विजयी मेळाव्यात सहभागी होणार का बाबत संभ्रम कायम आहे. त्यामुळे मराठीच्या मुद्द्यावरून मविआत फुटी पडलीय का? असा सवाल उपस्थित केला जातोय. तर दुसरीकडे राऊतांनी मात्र जे येतील त्यांचं योगदान आम्ही मराठीसाठी मान्य करू अशी प्रतिक्रिया दिलीय.

संबंधित बातम्या

Back to top button