सोमेश्वर कारखान्यावर सुनेत्रा पवारांचे निर्विवाद वर्चस्व

शरद पवार आणि जगताप यांच्या गटालाही जोरदार धक्का

21 पैकी 21 जागांवर विजय

मुंबई /12 ऑक्टोबर : श्री सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या नेतृत्वाखालील पॅनलने सर्वच्या सर्व 21 जागा जिंकत निर्विवाद वर्चस्व प्रस्थापित केले. अत्यंत अटीतटीच्या झालेल्या या निवडणुकीत सुनेत्रा पवार यांनी पुरुषोत्तम जगताप यांच्या पॅनलसह ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या गटालाही जोरदार धक्का दिला. दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर सुनेत्रा पवार यांनी प्रथमच निवडणुकीच्या मैदानात उतरून मिळविलेला हा विजय बारामतीतील राजकीय वर्चस्वाच्या दृष्टीने महत्त्वाचा मानला जात आहे.
सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत सुनेत्रा पवार यांच्या पॅनलचे सर्व 21 उमेदवार विजयी झाले. संग्राम सोरटे, प्रमोद काकडे, अभिजीत काकडे आणि वसंतराव दगडे या चार उमेदवारांनी दुपारच्या सुमारासच विजय मिळविला होता. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये जल्लोष सुरू झाला होता.
त्यानंतर सायंकाळी मतमोजणीचे संपूर्ण चित्र स्पष्ट झाले आणि सुनेत्रा पवार यांच्या पॅनलने सर्व जागांवर विजय मिळविल्याचे निश्चित झाले. बारामतीमध्ये कार्यकर्त्यांनी गुलालाची उधळण करीत विजयाचा आनंद साजरा केला.या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसमधून बंडखोरी केलेले पुरुषोत्तम जगताप यांनी भाजपच्या मदतीनेस्वतंत्र पॅनल उभे केले होते. मात्र, त्यांना मतदारांचा अपेक्षित पाठिंबा मिळविता आला नाही. गट क्रमांक दोनमध्ये जगताप पिछाडीवर होते. अखेर त्यांचाही पराभव झाला. त्यामुळे सुनेत्रा पवार यांच्या पॅनलने जगताप यांच्या राजकीय आव्हानावर मात केली.

 

Back to top button