कर्जमुक्तीसाठी शेतकरी रस्त्यावर; जिल्ह्यात ठिकठिकाणी चक्काजाम !

बच्चू कडूंच्या आवाहनाला उत्स्फूर्त प्रतिसाद

-सरकारविरोधात घोषणाबाजी आणि असंतोष
-पत्ते खेळून नोंदविला कृषी मंत्र्यांचा निषेध
-आंदोलनकर्त्यांनी रस्त्यावर जाळले टायर
अमरावती/ 24 जुलै : राज्यातील शेतकर्‍यांना कर्जमाफी देण्यात यावी या मागणीसाठी आज माजी मंत्री व प्रहार जनशक्ती पक्षाचे प्रमुख बच्चू कडू यांच्या आवाहनावरुन राज्यभर चक्काजाम आंदोलन करण्यात आले. त्याला अमरावती जिल्ह्याच्या ग्रामीण भागात शेतकर्‍यांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. हजारो शेतकरी व कार्यकर्त्यांनी सकाळी रस्त्यावर उतरुन आंदोलनात सहभाग घेतला व सरकारविरोधात आपला संताप व्यक्त केला.
आंदोलनामुळे जिल्ह्यातील जवळपास सर्वच मुख्य मार्गावरील वाहतूक व्यवस्था कोलमडून पडली होती. घोषणाबाजीमुळे आंदोलनस्थळ दणाणून गेले होते. शेतकरी व प्रहार कार्यकर्त्यांसोबतच दिव्यांग, मच्छिमार, मेंढपाळ, शेतमजूर सुद्धा या आंदोलनात सहभागी झाले होते. बच्चू कडू यांनी आंदोलन सुरू असलेल्या स्थळाला भेट दिली. काही ठिकाणी रस्त्यांवरच पत्त्यांचा डाव मांडून कृषी मंत्र्यांसोबतच सरकारचा अनोख्या पद्धतीने आंदोलनकर्त्यांनी निषेध नोंदविला. चांदुर बाजार तालुक्यात काही ठिकाणी रस्त्यांवर टायर जाळून वाहतूक अडविण्यात आली.
विधानसभा निवडणुकीत प्रचारादरम्यान महायुतीच्या नेत्यांनी आश्वासन देवूनही अद्याप राज्य सरकारने शेतकर्‍यांना कर्जमुक्त केलेले नाही. राज्याच्या पावसाळी अधिवेशनाची सांगता झाली तरी कर्जमुक्तीची घोषणा करण्यात आली नाही. राज्यातील अर्ध्यापेक्षा अधिक जनता शेतीवर अवलंबून असतानाही शेतकर्‍यांच्या प्रश्नांकडे शासन दुर्लक्ष करीत आहे, असा आरोप आंदोलनकर्त्यांकडून करण्यात आला. माजी मंत्री बच्चू कडू यांच्या नेतृत्वाखाली अमरावती जिल्ह्यात आज ठिकठिकाणी शेतकरी रस्त्यावर उतरले. अमरावती-नागपूर महामार्गासह अचलपूर, मोर्शी, तिवसा, चांदुर बाजार, धारणी तालुक्यात आंदोलनाचा मोठा प्रभाव जाणून आला.
अन्य ठिकाणीही प्रहारचे कार्यकर्ते आणि शेतकर्‍यांनी रास्तारोको करुन कर्जमाफ करण्याची मागणी केली. या चक्काजाम आंदोलनाला प्रहार जनशक्ती पक्ष, संभाजी ब्रिगेड, महाराष्ट्र नवनिर्माण सेना, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट), काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट), गोंडवाणा गणतंत्र पार्टी, एमआयएम, आम आदमी पार्टी आणि अपनी प्रजाहित पार्टी यांचा सक्रीय पाठिंबा मिळाला.
-महामार्गावरील वाहतूक तासभर रोखली
राष्ट्रीय महामार्गावरील नांदगाव पेठ येथील टोल नाक्यावर चक्काजाम करण्यात आला. या आंदोलनात शेतकरी, महिला, दिव्यांगांनीही मोठ्या संख्येने सहभाग घेतला. राष्ट्रीय महामार्गावरील नांदगाव पेठ टोल नाका येथे जोरदार घोषणाबाजी केली. या आंदोलनामुळे महामार्गावरील वाहतूक तासभर विस्कळीत झाली. पोलीस उपायुक्त गणेश शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली नांदगाव पेठ पोलिसांनी कडक बंदोबस्त ठेवत आंदोलकांना नियंत्रित केले. काही कार्यकर्त्यांना अटक करून नंतर सोडण्यात आले. प्रहारच्या कार्यकर्त्यांनी रस्त्यावरच पत्त्यांचा डाव मांडत निषेध केला.
-बच्चू कडूंसह 200 जणांवर गुन्हे
या चक्काजाम आंदोलनानंतर आता प्रहार कार्यकर्त्यांवर कायदेशीर कारवाईचा बडगा उगारण्यात आला आहे. बच्चू कडू यांच्यासह मंगेश देशमुख, प्रशांत शिरभाते, गोलू ऊर्फ राहुल पाटील, सुधीर उगले, निनाद चिकटे, नंदू वानखडे, जितू दुधाने, गौरव ठाकरे, मंगेश कविटकर, शेख अकबर शेख इस्माईल, अमित वानखडे, विनय जायले, चेतन बर्डे, सिद्धांत गवळी, निलेश ठाकूर व तसेच इतर 150 ते 200 कार्यकर्त्यांवर कलम 126(2), 189(2) भारतीय दंड संहिता आणि कलम 135 महाराष्ट्र पोलीस कायदा अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला.

संबंधित बातम्या

हे सुद्धा वाचा
Close
Back to top button