हिंदी सक्तीविरोधात राज ठाकरेंची गर्जना
मुंबईत 5 जुलैला महामोर्चा

-सर्व पक्षांना सहभागी होण्याचे आवाहन
-उद्धव ठाकरेंनाही निमंत्रण
मुंबई / जून: महाराष्ट्रातील शाळांमध्ये इयत्ता पहिलीपासून ते पाचवीपर्यंत तिसरी भाषा ही हिंदी भाषा अनिवार्य असेल, असं शुद्धिपत्रक राज्य शासनाच्या शिक्षण विभागाने जारी केल्यानंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी त्याला तीव्र विरोध केला. आज राज ठकारे यांनी पत्रकार परिषद घेऊन माय मराठीसाठी एक मोठी घोषणा केली. येत्या 5 जुलै रोजी मुंबईत मराठी भाषेसाठी आणि हिंदी भाषा सक्ती विरोधात त्यांनी महामोर्चा काढण्याचा निर्णय त्यांनी जाहीर केला. हा मोर्चा गिरगाव चौपाटीवरून काढणार असल्याचे त्यांनी सांगितले.
राज्यात इयत्ता पहिलीपासून तिसर्या भाषेच्या नावाखाली अप्रत्यक्षपणे हिंदी भाषा लादली जात असल्याचा आरोप करत मनसेने राज्य सरकारच्या शिक्षण धोरणाला तीव्र विरोध दर्शवला आहे. या पार्श्वभूमीवर सरकारने एक पाऊल मागे घेतले असून शिक्षणमंत्री दादा भुसे यांनी आज मनसे अध्यक्ष राज ठाकरे त्यांच्या शिवतीर्थ निवासस्थानी भेट घेतली. या बैठकीनंतर माध्यमांशी संवाद साधताना राज ठाकरे यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले की, आम्हाला शासनाची भूमिका कुठल्याही प्रकारे मान्य नाही. सरकारने पटवून देण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. यासोबतच राज ठाकरे यांनी 5 जुलै रोजी मराठी माणसांचा भव्य मोर्चा गिरगावहून निघणार, अशी घोषणा देखील केली आहे. या मोर्चाचे निमंत्रण शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासह सर्वपक्षीय नेत्यांना त्यांनी दिले आहे.
आमचा या संपूर्ण प्रकरणाला विरोध आहे आणि राहणारच आहे. हिंदी असेल किंवा इतर कोणत्या ही भाषेची सक्ती राहणार नाही, असा इशारा राज ठाकरेंनी दिला. हा महाराष्ट्राचं मराठी पण घालवायचा कट आहे. मी कट बोलतोय, कारण हा कटच आहे. आज सर्वजण विरोध दर्शवित आहोत, असेही राज ठाकरे म्हणाले. मला हे ही बघायच आहे की, कोण-कोण या मोर्चात सहभागी होत आहे आणि कोण येणार नाही. मला असे वाटत आहे की, ही महाराष्ट्राची लढाई आहे. त्यात सर्वांनी सहभागी व्हावे. कोणत्याही वादाशिवाय महाराष्ट्रहितासाठी एकत्र आलं पाहिजे. या वाक्याचा अर्थ तुम्हाला मोर्चात कळेल.
महाराष्ट्रचे सर्व राजकीय पक्ष आहे. त्यांच्याशी मी बोलणार आहे. आमची माणसे त्यांच्यासोबत बोलणार आहेत, असे म्हणत राज ठाकरे यांनी शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांना मोर्चाचे निमंत्रण दिले आहे. मोर्चात कोणते कलाकार येतात ते बघायचंय. मी बोलल्यानंतर कलाकार येतील. महाराष्ट्रात इतके प्रश्न असतांना केवळ आपण भाषेवर का येतोय? कोणती मोठी गोष्ट लपवण्याकरता हे चाललंय? असा सवाल देखील राज ठाकरेंनी उपस्थित केला. जेएनपीटीला रिक्त पदे आहेत. पण मुलाखती अदानी पोर्टला का सुरु आहेत? 6 तारखेच्या मोर्चाकरिता मी इतर राजकीय पक्षांसोबत बोलणार असल्याची माहिती राज ठाकरे यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे.
-मोर्चात कोणताच झेंडा नसणार
मी सर्व पक्षांना आवाहन करत आहे की, येत्या 6 जुलैला आम्ही गिरगाववरून मोर्चा काढायचे ठरवत आहे. यात कोणता ही झेंडा नसेल. हा मराठी माणसाचा मोर्चा असेल, आम्ही सर्वांना आमंत्रण देत आहोत. 5 जुलै रोजी सकाळी 10 वाजता हा मोर्चा असेल. मी बाकीच्या पक्षांसोबत बोलणार आहे, अशी घोषणा राज ठाकरे यांनी यावेळी केली.
-शिक्षणमंत्र्यांची भूमिका फेटाळली
महाराष्ट्र राज्याचे शिक्षण मंत्री आता येऊन गेले, त्यांची भूमिका त्यांनी स्पष्ट केली. मी पूर्णपणे भूमिका फेटाळून लावली. आम्हाला हे मान्य नाही, असे त्यांना सांगितल्याची माहिती राज ठाकरेंनी यावेळी दिली. दादा भुसे यांनी हे मान्य केलं की, राष्ट्रीय शिक्षण धोरणात कोणत्याही गोष्टीचा समावेश नाही. सीबीएससी शाळा या नव्याने आल्या. त्या आयएएस अधिकार्यांच्या मुलांसाठी काढलेल्या शाळा होत्या. त्या शाळांचा वर्चस्व राज्यातील शाळांवर करण्याचा प्रयत्न आहे. तोच केंद्र आणि आयएएस अधिकार्याांचा अजेंडा आहे. महाराष्ट्र हे का करतोय? त्यांच्याकडे काही गोष्टींचे उत्तर नव्हतं. आमचा या सर्व गोष्टीला विरोध होता असेल आणि राहणार, हे राज ठाकरेंनी स्पष्ट केले आहे.
-ठाकरे बंधू एकत्र येणार
राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी हिंदी भाषा सक्तीविरोधात मोर्चा काढण्याचा निर्णय घेतला आहे. दोन्ही नेत्यांनी स्वतंत्र्य पत्रकार परिषद घेऊन हिंदी सक्तीविरोधात आक्रमक भूमिका घेत मोर्चा काढणार असल्याचे जाहीर केले. मनसेने हिंदी सक्तीविरोधात 5 जुलै रोजी मोर्चा काढण्याचं ठरवलं आहे. तर उद्धव ठाकरे यांचा 7 जुलै रोजी मोर्चा निघणार आहे. मात्र, हिंदी सक्तीविरोधात एकच मोर्चा असायला हवा, असा प्रस्ताव मनसेने उद्धव ठाकरे यांना पाठवला. त्यामुळे हिंदी सक्तीविरोधात ठाकरे बंधू एकत्र येणार का, याकडे सार्यांचं लक्ष लागलं आहे.




