कुणावरही आरक्षणामुळे अन्याय होणार नाही
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे विधान

-मराठा आंदोलकांना सामारे जाणार
मुंबई / 28 ऑगस्ट : मराठा आरक्षणाच्या मुद्यावरून मराठा समाज पुन्हा सक्रिय झाला आहे. मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली हजारो नागरिकांचा मोर्चा जुन्नरहून मुंबईकडे निघाला आहे. राज्यभरातील मराठा बांधवांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवला असून मोर्च्यामध्ये युवक, महिला आणि विद्यार्थी यांचा मोठा सहभाग दिसून येत आहे.
मोर्चा मुंबईत पोहचण्याआधी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मराठा आरक्षणावर मोठं आश्वासन दिले. फडणवीस म्हणाले, आरक्षणावरून कुणावरही अन्याय होणार नाही. ओबीसी समाजावर अन्याय होणार नाही. मराठा समाजाचे प्रश्न आमच्याच सरकारने मार्गी लावले आहेत. ईडब्ल्यूएसमुळे अनेक प्रश्न सुटले आहेत. मराठा समाजाला आम्ही आरक्षण दिले आहे आणि ते कोर्टातही टिकले आहे.
मनोज जरांगे पाटील हे मुंबईतील आझाद मैदानावर उपोषणाला बसण्यावर ठाम आहेत. त्यांनी सरकारकडे आवाहन केले की, उपोषणासाठी कोणत्याही अटी-शर्थी लावू नयेत. हे आमचे शांततामय आंदोलन असून त्यात कोणतीही दडपशाही असू नये. फडणवीस यांनी आंदोलनांबाबत प्रतिक्रिया देताना सांगितले, प्रत्येकाला आपली मत मांडण्याचा अधिकार आहे. लोकतांत्रिक पद्धतीने जेवढी आंदोलनं होतील त्यांना आम्ही सामोरे जाऊ, चर्चा करू आणि योग्य मार्ग काढू.
जुन्नरमधील भगवं वादळ पाहून नागरिकांमध्ये उत्साह पसरला असून हजारो वाहनांची आणि लाखोंची गर्दी मोर्च्याला प्रतिसाद देत आहे. मोर्च्याचा दुसरा दिवस किल्ले शिवनेरीच्या पायथ्याशी नतमस्तक होऊन मुंबईकडे निघण्याचा आहे. मोर्च्याच्या मार्गावर सुरक्षा व्यवस्था कडक करण्यात आली असून पोलिसांच्या तैनातीमुळे नागरिकांच्या सोयीसाठी मार्ग व्यवस्थित ठेवले आहेत. मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर राज्यभरात सतत चर्चेला चालना मिळत असताना, मनोज जरांगेंच्या मोर्चामुळे पुन्हा एकदा सामाजिक व राजकीय वातावरण तणावग्रस्त झाले आहे. नागरिकांमध्ये उत्सुकता असून मोर्च्याचे पुढील टप्पे कसे पार पडतात हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.




