आईनेच घेतला पोटच्या तीन मुलींचा जीव
जेवणातून दिलं किटकनाशक औषध

-ठाण्याच्या शहापूरची धक्कादायक घटना
ठाणे / 27 जुलै : ठाणे जिल्ह्यातील शहापूर तालुक्यातील अस्नोली गावात आईच्या नात्याला काळीमा फासणारी संतापजनक आणि हृदयद्रावक घटना उघडकीस आली आहे. तीन मुलींच्या संगोपनाचा ताण सहन न झाल्यामुळं आईनेचं आपल्या पोटच्या तिन्ही अल्पवयीन मुलींना जेवणातून कीटकनाशक औषध देऊन हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. मृत मुलींची नावे काव्या संदीप भेरे (वय 10), दिव्या संदीप भेरे (वय 8) आणि गार्गी संदीप भेरे (वय 5) अशी आहेत.
या तिघींना जेवणातून विषबाधा झाल्याने तिन्ही मुलींची प्रकृती खालावल्याने वेगवेगळ्या रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, नायर रुग्णालयात दाखल करण्यात आलेल्या दोन व घोटी येथील एसएमबीटी रुग्णालयात दाखल करण्यात आलेले एक अशा तिन्ही मुलींचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, काही दिवसांपूर्वी पती-पत्नीमध्ये किरकोळ वाद झाल्याने संबंधित महिला तिच्या चेरपोली येथील सासरवाडीतून माहेरी अस्नोली येथे परतली होती. तसेच आर्थिक अडचणी, मानसिक तणाव आणि जबाबदार्यांच्या ओझ्यामुळे ती तणावाखाली होती. याच नैराश्यातून तिने हा टोकाचा निर्णय घेतल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.
या प्रकरणी किन्हवली पोलीस ठाण्यात आईच्या विरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या आईला अटक करण्यात आली असून किन्हवली पोलीस तपास करीत आहेत. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात असून, गरिबी, मानसिक आरोग्य आणि पालकत्वाच्या जबाबदार्यांचा सामाजिक मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.
दरम्यान, एकाच वेळी तिन्ही बहिणींचा मृत्यू झाल्यानं परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. नेमकी मुलींना विषबाधा झाली की दुसरे काही आहे, याबाबतचा तपास देखील पोलिसांनी सुरु केला होता. दरम्यान, या तिन्ही मुलींच्या मृत्यूबाबत मुलींच्या आईची संशयास्पद भूमिका वाटत असल्यानं पोलिसांनी आईला ताब्यात घेतलं होतं. मुलींच्या आईची पोलिसांनी कसून चौकशी केली होती. दरम्यान, मुलींना त्रास जाणवू लागल्यानंतर रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, उपचार सुरु असतानाच तुन्ही मुलींचा मृत्यू झाला आहे.




