मंत्रीच सुरक्षित नाहीत; त्यांच्या बेडरुमपर्यंत कॅमेरा जातो
अनिल परब यांची टीका

-शिंदे सेनेच्या मंत्र्यांवर घणाघात
-चड्डी-बणीयान गँग असे संबोधन
मुंबई / 15 जुलै: विधान परिषदेमध्ये आज प्रश्नोत्तराच्या तासात वेगवेगळ्या प्रश्नाबाबत चर्चा होत असताना, अनिल परब यांनी संजय शिरसाट यांच्या व्हायरल व्हिडिओ संदर्भात राज्यात मंत्रीच सुरक्षित नाहीत अशी टीका केली. काही दिवसापूर्वी सरकारने जनसुरक्षा विधेयक पारित केलं आणि मोठी-मोठी भाषणं केली. पण आमचं म्हणणं आहे जनतेची सुरक्षा ठेवा बाजूला, पहिली आपल्या मंत्र्यांची सुरक्षा करा असा टोला लगावला. जर मंत्र्यांचा नोटांच्या बंडलांसोबतचा व्हिडिओ जर व्हायरल होत असेल तर सामान्य लोक कसे सुरक्षित असतील? असा सवाल यावेळी अनिल परब यांनी केला आहे.
मंत्र्यांच्या बेडरुमधले व्हिडिओ बाहेर येत आहेत : यावर पुढे बोलताना परब यांनी चड्डी बनियन किंवा टॉवेल बनियान गँगचे वेगवेगळे व्हिडिओ सध्या वायरल होत आहेत. यामुळं महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळाची किती नाचक्की होत आहे. अधिवेशन सुरु आहे, इन्कम टॅक्सच्या नोटिसा असताना देखील धीट मंत्र्यांच्या बेडरुममधील व्हिडिओमध्ये पैशांची बॅग दिसते, या मंत्र्यांच्या सुरक्षेचा विचार सरकारने केला पाहिजे असं परब म्हणाले. अगदीच काही नाही तर सरकारने मंत्र्यांना दोन दोन कपडे द्यावे, सगळे मंत्री उघडे फिरतायत अशी कोपरखळी परब यांनी मारली.
डिजिटलायझेशन फ्रॉड होत असून त्यामुळं तुमचीच यंत्रणा पोखरली गेली आहे. हा डिजिटलायझेशन फ्रॉड मंत्र्यांच्या घरापर्यंत गेला आहे. यामुळं मंत्रीच सुरक्षित नाहीत. त्यामुळं या प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी लावून हा व्हिडिओ खरा आहे की खोटा आहे हे तपासावे. आधी मंत्र्यांना सुरक्षित करा आणि मग जनतेला सुरक्षा द्या, यावर अडीच तासांची चर्चा ठेवा, अशी मागणी अनिल परब यांनी केली.
खासदार संजय राऊत यांनी आयकर विभागाच्या नोटीसमुळं चर्चेत आलेले मंत्री संजय शिरसाट यांच्यावर आरोप करणारे एक ट्विट केले होते. यामध्ये एक व्हिडिओ देखील पोस्ट केला होता. या ट्विटमध्ये संजय शिरसाट आपल्या बेडरूममध्ये बसल्याचं दिसून येत असून शिरसाट यांच्या हातात सिगारेट आहे. ते कोणाशीतरी फोनवर बोलत आहे. याशिवाय, संजय शिरसाट ज्या पलंगावर बसले आहेत. त्या पलंगाखाली एक मोठी बॅग असून, या बॅगेत पैसे असल्याचं त्या व्हिडिओत दिसून येत आहे. दरम्यान, या व्हिडिओची सध्या राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहे. असे हे प्रकरण आहे.




