मनोज जरांगे आणि राधाकृष्ण विखे पाटील यांची भेट

सव्वा तास बंद दाराआड चर्चा

जालना /9 ऑक्टोबर : मराठा उप समितीचे अध्यक्ष, मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी आज अंतरवाली सरायटीमध्ये जाऊन मनोज जरांगे यांची भेट घेतली. या वेळी दोघांनी एकमेकांचा सत्कार केला आणि जवळपास सव्वा तास बंद दाराआड चर्चा केली. राधाकृष्ण विखे पाटील यांनी सांगितले की, ही भेट व्यक्तिगत असून त्यांनी एकमेकांच्या तब्येतीची विचारपूस केली.

विखे पाटील यांनी म्हटले की, 2 सप्टेंबरच्या जीआरबाबत न्यायालयाने स्थगिती दिली नाही, तसेच उच्च न्यायालयाचा निर्णय सर्वांनी मान्य केला पाहिजे. ओबीसींच्या आरक्षणाला कोणताही धक्का लागत नसल्यामुळे या प्रक्रियेला पुढे जाण्यास प्रोत्साहन देण्याचे त्यांनी ओबीसी नेत्यांना आवाहन केले.

ते म्हणाले की, “शरद पवार यांनी मंडल आयोगाची अंमलबजावणी करताना मराठा समाजाचा समावेश केला असता, तर हा प्रश्न निर्माण झाला नसता.” त्याचबरोबर, विखे पाटील यांनी शरद पवार यांना सामाजिक विषमता निर्माण करण्यासाठी जबाबदार असल्याचा आरोप देखील केला. हैदराबाद गॅझिटिअरच्या जीआर संदर्भातील प्रकरण न्यायालयात असताना, गावी जाऊन मोर्चे काढणे योग्य नाही, असेही विखे पाटील यांनी ओबीसी नेत्यांना उद्देशून स्पष्ट केले.

* मनोज जरांगे काय म्हणाले?

राधाकृष्ण विखे पाटील यांच्या भेटीनंतर मनोज जरांगे यांनी प्रतिक्रिया दिली आणि सांगितले की, “मी विखे पाटीलांना स्पष्ट सांगितले आहे  मला जीआरनुसार प्रमाणपत्र पाहिजे.” त्यांनी म्हटले की, त्यांनी विखेंसोबत एक-दोन तास सविस्तर चर्चा केली असून विखे पाटीलमध्ये शंभर टक्के प्रामाणिकपणा दिसतो; “तो माणूस 100% गोरगरीब मराठ्यांच्या लेकरांचे कल्याण करेल, असा आम्हाला विश्वास वाटतो. ज्या दिवशी वाटणार नाही, त्या दिवशी आपण सरकारच्या विरोधात जाणार. तुम्ही आरक्षण दिलं, तर आम्हाला काय घेणं पडलं राजकारणाचं  जो देईल तो आमचाच,” असे मनोज जरांगे यांनी स्पष्ट केले.

संबंधित बातम्या

Back to top button