मराठा-कुणबी एकच : सरकारचा ऐतिहासिक जीआर जाहीर

मराठ्यांचा विजय! जरांगेंचे उपोषण मागे

-हैदराबाद व सातारा गॅझेटिअरला मान्यता
-आंदोलनातील गुन्हे मागे; बळी गेलेल्यांच्या वारसांना नोकरी
-पाचही मागण्या मंजूर, आरक्षणाचा मार्ग मोकळा
मुंबई / 2 सप्टेंबर : मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर अखेर तोडगा निघाला आहे. गेल्या पाच दिवसांपासून मुंबईतील आझाद मैदानावर उपोषणास बसलेले मराठा नेते मनोज जरांगे पाटील यांनी मंगळवारी संध्याकाळी आपले उपोषण मागे घेतले. मंत्रीमंडळ उपसमितीचे अध्यक्ष राधाकृष्ण विखे-पाटील यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने जरांगे यांची भेट घेतली आणि त्यांच्या प्रमुख मागण्यांवर सरकारने सकारात्मक निर्णय घेतल्याचे कळवले. त्यानंतर सरकारने तातडीने जीआर काढत तोडगा अमलात आणला. या निर्णयामुळे मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र मिळविण्याचा मार्ग मोकळा झाला असून, अनेक वर्षांपासून पेटलेला वाद आणि संघर्ष संपुष्टात येण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
सरकारने जरांगे यांच्या पाच महत्वाच्या मागण्यांना मान्यता दिली आहे. हैदराबाद गॅझेटिअरप्रमाणे कुणबी नोंदी करण्यात येतील, सातारा गॅझेटिअरमधील नोंदी आधार मानल्या जातील, आंदोलनादरम्यान नोंदवलेले सर्व गुन्हे या महिन्याभरात मागे घेण्यात येतील, आंदोलनात बळी गेलेल्यांच्या वारसांना नोकरी देण्यात येईल आणि मराठा-कुणबी एकच असल्याचा जीआर शासनाने काढला आहे.
29 ऑगस्टपासून सुरु असलेले जरांगे यांचे उपोषण आज संपुष्टात आले. सरकारचा जीआर स्वीकारत त्यांनी उपोषण मागे घेतल्याचे जाहीर केले आणि आंदोलक आज रात्री मुंबई सोडतील, असेही सांगितले. 2023 मधील आंदोलनात 19 आंदोलकांनी आत्महत्या केली होती, तर काहींचा मृत्यू हृदयविकारामुळे झाला. त्यांच्या वारसांना सरकारकडून नोकरी देण्याची घोषणा झाली आहे. तसेच, आंदोलनादरम्यान आंदोलकांवर दाखल झालेल्या गुन्ह्याही या महिन्यात मागे घेतले जाणार आहेत.
या निर्णयामुळे मराठवाड्यातील मराठा समाजाला मोठा दिलासा मिळाला आहे. सरकारने हैदराबाद व सातारा गॅझेटिअरला मान्यता देत मराठा-कुणबी एकच असल्याचे शिक्कामोर्तब केले आहे. फॅमिली ट्रीच्या आधारे कुणबी दाखला देण्याचा मार्ग खुला करण्यात आला असून, आंदोलनातील सर्व गुन्हे मागे घेण्यासह बळी गेलेल्या कुटुंबीयांना नोकरी देण्याची हमी दिली आहे. या तोडग्यामुळे मराठा समाजाच्या दीर्घकाळच्या संघर्षाला मोठा आधार मिळाल्याचे स्पष्ट झाले असून, प्रत्यक्षात प्रमाणपत्र वाटप किती पारदर्शक आणि जलद गतीने होते, याकडे आता राज्याचे लक्ष लागले आहे.
-मुंबईसह सर्वत्र मराठा बांधवांचा जल्लोश
आजच्या घडामोडींनंतर मनोज जरांगेंसह मराठ्यांनी या लढाईत मैदान मारल्याची समाजाची भावना असून या यशाचा मुंबईसह संपूर्ण राज्यात आनंदोत्सव साजरा करण्यात येत आहे. मनोज जरांगे यांचे उपोषण संपल्यावर मुंबईत आलेल्या आंदोलकांनी ठिकठिकाणी एकच जल्लोष केला. गावोगावी गुलाल उधळून आनंदोत्सव रंगला. जरांगे यांच्या अंतरवाली सराटी गावात तर लोकांनी न भुतो न भविष्यती असा जल्लोश करत आनंद व्यक्त केला.
-पार्श्वभूमी : गॅझेटिअरचा पुरावा
हैदराबाद निजामशाही काळात तयार झालेल्या गॅझेटिअरमध्ये मराठा समाजाला ‘कुणबी’ म्हणून संबोधले गेलेले अनेक उल्लेख आढळतात. ब्रिटिशकालीन सातारा गॅझेटिअरमध्येही अशीच नोंद आहे. हाच ऐतिहासिक पुरावा आधार मानून मराठा समाजाने आरक्षणाची मागणी केली होती. यामुळे आता फॅमिली ट्रीच्या आधारे व नातेवाईकांच्या प्रमाणपत्रांचा आधार घेऊन कुणबी दाखला मिळण्याचा मार्ग सुकर झाला आहे.

संबंधित बातम्या

Back to top button