मुंबईत मराठा आंदोलन तापले; हायकोर्टाचा हस्तक्षेप
दुपारपर्यंत सीएसएमटी, मरीन ड्राईव्ह रिकामे करा

-न्यायालयाचे सरकारला कारवाईचे आदेश
-आरक्षणाशिवाय हटणार नाही, समाजाची ठाम भूमिका
-आझाद मैदानावर पाच हजारांसाठी मंडप
मुंबई / 1 सप्टेंबर : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी सुरु झालेले आंदोलन आता मुंबईच्या हृदयस्थानी म्हणजे आझाद मैदानावर प्रचंड आकार घेत आहे. मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखालील या आंदोलनाचा आज सोमवार (1 सप्टेंबर) चौथा दिवस असून, पाटील यांनी आजपासून पाणी पिणेही बंद केले आहे. सुरुवातीला केवळ एका दिवसाची परवानगी घेऊन सुरू झालेला हा लढा आता दीर्घकालीन संघर्षात परिवर्तित होताना दिसत आहे.
दरम्यान, आंदोलनाच्या विरोधात अॅड. गुणरत्न सदावर्ते यांनी दाखल केलेल्या याचिकेवर सोमवारी हायकोर्टात सुनावणी झाली. महाअधिवक्ता बिरींद्र सराफ यांनी जरांगे यांनी दिलेल्या हमीपत्राचे उल्लंघन झाल्याचे सांगितले. सुनावणीमध्ये न्यायालयाने सरकारला स्पष्ट निर्देश दिले, मुंबईबाहेरून येणार्या आंदोलकांना ठाण्यातच थांबवा, उद्या दुपारी 4 पर्यंत सीएसएमटी, मरीन ड्राईव्ह व दक्षिण मुंबईतील रस्ते मोकळे करा, आझाद मैदान सोडून इतरत्र रस्त्यावर जमलेले आंदोलक हटवा, शाळा, कॉलेज, वाहतूक यावर परिणाम होऊ देऊ नका असे कोर्टाने सरकारला बजावले आहे. आंदोलनाच्या विरोधात नाही, पण अटींचे पालन व्हावे. तुम्ही रस्ते आडवून मुंबई थांबवू शकत नाही, असे स्पष्ट शब्दांत कोर्टाने सांगितले. मंगळवारी पून्हा हायकोर्टात याविषयावर दुपारी 3 वाजता सुनावणी होणार आहे.
आंदोलनाच्या सुरुवातीचे दोन दिवस आंदोलकांना पावसात भिजावे लागले. चिखलमय झालेल्या मैदानात बसणे-उभे राहणे कठीण झाले होते. त्यामुळे आता मराठा बांधव स्वतःच पुढे सरसावत आहेत. आझाद मैदानावर तब्बल पाच हजार लोकांसाठी वॉटरप्रूफ मंडप उभारण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. रात्रीतून कचखडी टाकण्यात आली. मोठा स्टेज तयार होत आहे. हे दृश्य पाहून स्पष्ट होते की आंदोलन अल्पकाळापुरते मर्यादित राहणार नाही. उलट पुढील काही दिवसांमध्ये ते आणखी व्यापक होण्याची चिन्हे आहेत. आझाद मैदानावर बसलेल्या हजारोंच्या गर्दीत एकाच भावना उमटते आहे, आरक्षणाशिवाय परतायचं नाही. गावागावातून आलेले युवक, महिला, ज्येष्ठ नागरिक यांची उपस्थिती वेगळी ऊर्जा देत आहे. पावसात भिजत, अन्न-पाणी टंचाईतही आंदोलनात ठाम राहण्याची जिद्द जाणवते.
पाच हजारांसाठी मंडप, रसद पुरवठा, राजकीय नेत्यांची भेटीगाठी, कोर्टाचे आदेश – या सगळ्या घडामोडींनी आंदोलन अधिकच गुंतागुंतीचे बनले आहे. सरकारसमोर कठीण परीक्षा आहे. हायकोर्टाचा इशारा पाळून मुंबई सुरळीत ठेवणे, आणि दुसरीकडे आंदोलकांच्या भावनांचा स्फोट हाताळणे, हा दुहेरी ताण प्रशासनावर आहे. जरांगे पाटीलांचे आमरण उपोषण किती दिवस चालेल, सरकार कधी व कसा तोडगा काढेल, हे पुढील काही दिवसांत महाराष्ट्राच्या राजकीय क्षितिजावर ठरेल. मात्र इतके स्पष्ट आहे की, मराठा समाजाचा हा महासंग्राम आता थांबवणे सोपे राहिलेले नाही.
-राज्यभरातून रसद पोहोचतेय
सुरुवातीच्या दोन दिवसांत आंदोलकांना प्रचंड गैरसोयी सहन कराव्या लागल्या. पण लगेचच राज्यभरातून मराठा बांधव मदतीला सरसावले. कोल्हापूर, सांगली, सातारा, मराठवाडा या भागातून भाकरी, जेवण, बिस्कीट, पाणी बाटल्या पाठवल्या जात आहेत. जत तालुक्यातील वाळेखिंडी गावातून तर तब्बल पाच हजार भाकरी, केळी व पाणी बाटल्या रवाना करण्यात आल्या. मुंबईतील स्थानिक नागरिकांनी देखील मदतीसाठी धाव घेत आंदोलकांसाठी जेवणाची व्यवस्था केली आहे.
-अटल सेतूवर तणाव
जत येथून रसद घेऊन आलेल्या वाहनांना मुंबई पोलिसांनी अडवले. यावरून माजी आमदार विक्रम सावंत व पोलिसांत जोरदार वाद झाला. काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले, मात्र शेवटी वाहने सोडण्यात आली. नंतर सावंत यांनी आझाद मैदानावर येऊन जरांगे पाटीलांची भेट घेऊन पाठिंबा दिला.




