खडसेंना तुतारीचा विसर; चक्क कमळासाठी मागितली मतं!
कार्यकर्त्यांनी आठवण करून दिल्यानंतर सावरासावर

भुसावळ/30 नोव्हेंबर – राजकीय नेत्यांच्या पक्षबदलांचा फटका त्यांनाच कधीकधी विचित्रपणे बसतो. भुसावळ येथे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या उमेदवारांच्या प्रचारसभेत ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी केलेल्या विधानामुळे राजकीय वर्तुळात ‘हसरी’ चर्चा सुरू झाली आहे. राष्ट्रवादीच्या उमेदवारासाठी प्रचार करताना एकनाथ खडसे यांनी भर सभेत उपस्थित कार्यकर्त्यांसमोर थेट ‘भाजपला मतदान करा’ असं आवाहन केल्याचं दिसून आलं.
हे ऐकून कार्यकर्ते चपापले आणि क्षणभर गोंधळ निर्माण झाला. भानावर आलेल्या राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी नाथाभाऊंना तुतारीची आठवण करून दिली. लगेच, एकनाथ खडसे यांनी ‘तुतारीलाच मतदान करा’ असं म्हणत बाजू सावरली. ‘अनेक वर्षे आपण भारतीय जनता पार्टीमध्ये काम केलं असल्याने कमळाचा उल्लेख केला गेला,’ असे स्पष्टीकरण त्यांनी दिले. पण, त्यांच्या या वक्तव्यानंतर राजकीय वर्तुळात मात्र चर्चांना उधाण आले आहे. एके काळी भारतीय जनता पार्टीच्या मातब्बर नेत्यांमध्ये गणना होणारे एकनाथ खडसे, राजी-नाराजीनाट्यानंतर शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये गेले. नंतर, त्या पक्षाचे दोन भाग होऊन, एक राष्ट्रवादी घड्याळ तर दुसराही राष्ट्रवादीच पण तुतारी झाला. आता या बदलांनी मतदारच गोंधळलेले असताना, नेते गोंधळात पडले तर त्यात नवल ते काय? या प्रकरणावर भाजप आमदार मंगेश चव्हाण यांनी खोचक प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले की,‘एकनाथ खडसे जर बिन बुलाया मेहमानाप्रमाणे आमचा प्रचार करत असतील आणि त्यामुळे भाजपची संघटन वाढत असेल, तर आम्हाला काही आक्षेप नाही. राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांनीच त्यांना आमदारकी दिली, ते मुख्यमंत्रीपदाचे दावेदार होते पण, आज ते भाजपचं नाव घेत आहेत. कदाचित पवार साहेबांनीच त्यांना भाजपचा प्रचार करायला सांगितला असावा.’अलीकडेच मुक्ताईनगर नगरपालिका निवडणुकीत राष्ट-वादी शरद पवार गटाने तिथे राष्ट्रवादीचा उमेदवार ‘सक्षम नाही’ असे कारण सांगून, उमेदवार न देण्याचा निर्णय घेतला होता. यामुळे खडसे यांनी केंद्रीय मंत्री रक्षा खडसे यांना अप्रत्यक्ष फायदा मिळवून दिल्याची चर्चा रंगली होती. आता भुसावळमधील त्यांच्या या ताज्या विधानामुळे चर्चांना ऊत आला आहे.




