उद्योगांच्या प्रगतीत सनदी लेखापालांचे महत्वपूर्ण योगदान

आ. संजय खोडके यांचे प्रतिपादन

-एमएसएमई महोत्सवाचे थाटात उदघाटन
-आयसीएआय अमरावती शाखेतर्फे आयोजन
अमरावती / 27 जून: शहराच्या विस्ताराबरोबच औद्योगिक क्षेत्र सुद्धा वाढत चालले आहे. देशातील नामांकित उद्योग समूह सुद्धा अमरावतीमध्ये गुंतवणुकीसाठी तयार असून त्यांना सर्वप्रकारच्या भौतिक सुविधा व कुशल मनुष्यबळ उपलब्ध करून देण्यासाठी शासनाने सकारात्मक पाऊले उचलली आहे. या आस्थापनांना आर्थिक सल्लामसलत यासह वित्तीय सेवा प्रदान करण्यासाठी सनदी लेखापालांचे महत्व अधोरेखित झाले आहे. या क्षेत्राचा विकास करण्यासाठी नवकल्पना, संशोधन व नाविन्यपूर्ण प्रशिक्षणाच्या संधी निर्माण करण्यासाठी आपले प्रयत्न राहणार असल्याचे प्रतिपादन आ. संजय खोडके यांनी केले.
दि इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाऊंटंट ऑफ इंडिया अमरावती शाखेच्या वतीने आज शुक्रवार, 27 जुन रोजी सातुर्णा स्थित सीए भवन येथे आंतरराष्ट्रीय सूक्ष्म, लघु व मध्यम उपक्रम दिना निमित्य आयोजित एमएसएमई महोत्सवाच्या उदघाटनाप्रसंगी ते बोलत होते. यावेळी आयसीएआय अमरावतीचे अध्यक्ष सीए दिव्या त्रिकोटी, महाराष्ट्र औद्योगिक वसाहत मंडळाचे प्रादेशिक अधिकारी राम लंके, चेंबर ऑफ एमएसएमईचे चेअरमन ज्ञानचंद्र मिश्रा, सीए अर्पित काबरा तसेच आयसीएआय अमरावतीचे उपाध्यक्ष सीए हर्ष शर्मा, सचिव सीए संदीप सुराना, सीए आदित्य खंडेलवाल, सीए अभय साहू, सीए ललित तांबी उपस्थित होते. सर्वप्रथम मान्यवर अतिथींच्या हस्ते दीपप्रज्वलन करून एमएसएमई महोत्सवाचे उदघाटन करण्यात आले.
पुढे बोलतांना आ. संजय खोडके म्हणाले की, लघु व मध्यम उद्योजकांना गुंतवणुकीसाठी उत्पादन व सेवा प्रदान करण्यासाठी सूक्ष्म, लघु व मध्यम उपक्रम सुरु करण्यात आला आहे. या उपक्रमामुळे आज उद्योजकता विकास साधण्यात आला असून आगामी काळाची गरज लक्षात घेता या क्षेत्रात नव्या संधी व सुविधा निर्माण करण्याच्या दिशेने सुद्धा पाऊले उचलली जात आहे. आज एमआयडीसी असो किंवा जिल्हा उद्योग केंद्र असो ,किंवा अन्य कुठले उद्योग समूह यांच्या समन्वयातून नवे उद्योजक घडविले जात असतांना त्यांना आर्थिक व्यवस्थापन, लेखापरीक्षण व कर आकारणी पासून ते आर्थिक सल्लामसलत व वित्तीय सेवा देण्यासाठी सनदी लेखापाल हे एक व्यावसायिक पद सर्व आस्थापनांमध्ये निर्माण करणे महत्वाचे आहे.
अमरावतीच्या शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयात लवकरच सेंटर फॉर इन्व्हेन्शन, इनोव्हेशन, इक्यूबेशन अँड ट्रेनिंग या कौशल्यवर्धन केंद्राची उभारणी होत आहे. या केंद्रामध्ये सनदी लेखापाल होऊ प्रशिक्षणार्थींना इंटर्नशिपची संधी उपलब्ध करून देण्याचा मानस सुद्धा आ. संजय खोडके यांनी व्यक्त केला. आगामी काळात अमरावतीचे उद्योग क्षेत्र वाढणार असल्याने त्या ठिकाणी नामांकित कंपन्यांना पायाभूत सुविधा, पाणी व वीज याबाबतची मुबलकता उपलब्ध होत असल्याचे सुद्धा त्यांनी सांगितले. याप्रसंगी आयसीएआय अमरावतीचे अध्यक्ष सीए दिव्या त्रिकोटी यांनी मार्दर्शन करतांना केवळ उद्योगच नाही तर प्रत्येक आर्थिक व्यवहार व कामकाजात सनदी लेखापाल यांचा सल्ला महत्वाचा असल्याचे सांगितले. आजच्या सायबर युगात आर्थिक व्यवहाराच्या फसवणूक व गैरप्रकाराच्या तक्रारी वाढत आहे. त्यामुळे उद्योग, बँकिंग, सहकार व गुंतवणूक अशा विविध क्षेत्रातील नागरिकांनी सनदी लेखापालाचा सल्ला घेऊनच आर्थिक सुबत्ता प्राप्त करण्याचे आवाहन त्रिकोटी यांनी केले.
यावेळी उपस्थित वक्त्यांनी सुद्धा विविध सत्रातील विषयांच्या अनुसरून मार्गदर्शन केले. संजय लाखोटिया, गिरीश चांडक, राजेश चांडक, दामोदर खंडेलवाल, राजेंद्र खंडेलवाल, विनोद तांबी, विष्णूकांत सोनी, पवन जाजू, गोपाल सोमाणी, दि इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाऊंटंट ऑफ इंडिया अमरावती शाखेच्या पदाधिकारी व सदस्य, एमआयडीसी, जिल्हा उद्योग केंद्र, वित्तीय संस्था, तसेच नामांकित उद्योग समूहाचे प्रतिनिधी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दीप्ती राठी यांनी केले.

संबंधित बातम्या

Back to top button