घराच्या मागे आढळला आठ फुट लांबीचा अजगर

भातकुलीच्या निमखेड्यात दहशत

-सर्पमित्रांनी रस्क्यू करुन जंगलात सोडले
अमरावती/ 22 जून: भातकुली तालुक्यातील निमखेडा येथे भर वस्तीत एका घराच्या मागे 8 फुट लांबीचा भला मोठा अजगर आढळून आल्याने चांगलीच खळबळ उडाली होती. येथील रहिवाशांमध्ये त्यामुळे दहशत निर्माण झालेली असताना काही सर्पमित्रांनी गावात पोहोचून शिताफीने या अजगराला ताब्यात घेतले आणि सुरक्षितरीत्या जंगलात सोडले.
प्राप्त माहितीनुसार भातकुली तालुक्यातील निमखेडा येथील रहिवासी अरुण रंगारी यांच्या घरामागे शनिवारी रात्रीच्या सुमारास हा आठ फुट लांबीचा अजगर आढळून आला. झाडाझुडपातून हा अजगर रहिवासी वस्तीत येउन पोहोचला होता. परिसरातील काही लोकांची या अजगरावर नजर पडल्यानंतर परिसरात चांगलीच खळबळ उडाली. अजगर पाहण्यासाठी गावकर्‍यांनी येथे मोठी गर्दी केली होती. भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.
याबाबत काही सर्पमित्रांना गावकर्‍यांनी माहिती दिली. त्यानंतर सागर धारपाड, अमर राउत, दिनेश महिंगे, प्रशिक रंगारी, वैभव रंगारी या हे सर्पमित्र अजगर असलेल्या ठिकाणी पोहोचले. त्यांनी मोठ्या शिताफीने या अजगराला ताब्यात घेतले आणि गावकर्‍यांनी सुटकेचा निश्वास सोडला. काही वेळाने या सर्पमित्रांनी अजगराला परिसरातील दाट जंगलात सुरक्षित सोडून दिले.

संबंधित बातम्या

Back to top button