ट्रकमधील 27 टन तांदुळ लुटणार्या दोघांना सहा तासांत अटक
ट्रक चालकाचे अपहरण व मारहाण

-गुन्हे शाखा युनिट-1 ची कारवाई
अमरावती / 24 जून: नांदगाव पेठ पोलिस ठाण्याच्या हद्दीत महामार्गावरील सेलिब्रेशन हॉलसमोर रात्री एका ट्रकचालकाला मारहाण करुन व त्याचे अपहरण करुन 27 टन तांदुळ लुटून पसार झालेल्या चौघांच्या टोळीतील दोन आरोपींना अटक करण्यात अमरावती पोलिस आयुक्तालयाच्या गुन्हे शाखा युनिट – 1 च्या पथकाला यश प्राप्त झाले आहे. याप्रकरणात तक्रार दाखल झाल्यानंतर अवघ्या सहा तासांत गुन्हे शाखेने ही कारवाई केली. अन्य दोन फरार आरोपींचा कसून शोध सुरु आहे. अजमत खान करामत खान (36, रहमत नगर) आणि शेख इमरान शेख रहमान (34, हबीब नगर नं. 1) अशी अटक करण्यात आलेल्या अरोपींची नावे आहेत.
गत 22 जून रोजी जळगाव येथील निझामुद्दीन मोहम्मद सईद यांनी ट्रकमध्ये 27 टन तांदूळ भरले व ते गोंदिया येथे जात असतांना 4 अनोळखी ईसमांनी एका चारचाकी वाहनाने अमरावतीजवळच्या रींगरोड येथील सेलिब्रेशन हॉलजवळ ट्रक थांबविला तसेच चालक निझामुद्दीन यांना ट्रकच्या खाली उतरवून मारहाण केली. इतकेच नव्हे तर त्यांच्या डोळ्याला पट्टी बांधून दुसर्या चारचाकी वाहनात जबरीने बसवून 4 तास फिरविले आणि ट्रक मधील 7 लाख रुपयांचा 27 टन तांदूळ दुसर्या ट्रकमध्ये भरला. त्यानंतर निझामुद्दीन व त्याच्या ट्रकला एका निर्जनस्थळी सोडून तांदळाने भरलेल्या ट्रकसह पळून गेले.
निझामुद्दीन यांनी नांदगांव पेठ पोलिस ठाण्यात याबाबत तक्रार दाखल केली. हा गुन्हा दुस्साहसपूर्ण असल्याने अमरावती आयुक्तालयातील वरिष्ठ अधिकार्यांनी तात्काळ घटनास्थळी पाहणी केली. त्यानंतर पोलिसांनी या मार्गावरील सीसीटीव्ही फुटेज तपासून व गुप्त बातमीदारांकडून माहिती काढली असता काही इसमांनी लालखडी भागात तांदुळाने भरलेला ट्रक आणल्याचे कळले. पोलिस पथक लगेच लालखडी भागात पोहचले व अजमत खान करामत खान, आणि शेख ईम्रान शेख रहेमान या दोघांना ताब्यात घेतले.
त्यांच्याकडून चोरीचा 27 टन तांदूळ व टाटा ट्रक जप्त केला. ही कारवाई वरिष्ठ पोलिस निरीक्षक गोरखनाथ जाधव, सहाय्यक निरीक्षक मनीष वाकोडे, उपनिरीक्षक प्रकाश झोपाटे, कर्मचारी फिरोज खान, सतीश देशमुख, सचिन बहाळे, प्रशांत मोहोड, अलिमोद्दीन खतीब, नाझीमोद्दीन सैयद, विकास गुडधे, सचिन भोयर, रणजीत गावंडे, सूरज चव्हाण, निखील गेडाम, अशोक खंगार, किशोर खेंगरे यांनी केली.




