2 हजार 652 ‘लाडक्या बहिणी’ निघाल्या ‘खोटारड्या’

‘देवाभाऊ’कारवाई करणार

-सरकारी नोकरी तरीही हाव सुटेना!
मुंबई / 30 मे: विधानसभा निवडणुकीपूर्वी ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजना राबवून महायुतीचं सरकार पुन्हा स्थापन झाले. या विजयाचे श्रेय मिळवून देणार्‍या लाडकी बहीण योजनेच्या अर्जाची तपासणी होत आहे. यात अनेक गैरप्रकार समोर आले आहेत. खोटी माहिती देत योजनेचा लाभ घेणार्‍या महिलांचे अर्ज बाद करण्यात येत आहे. अशातच मोठी धक्कादायक माहिती समोर आली आहे. लाडकी बहीण योजनेचा लाभ सरकारी कर्मचारी महिलांना घेता येणार नाही, असे स्पष्टपणे प्रशासनाने म्हटले होते. तरीही काही महिला कर्मचार्‍यांनी अर्ज भरले अन् योजनेचा पैसा हडप केला. वर्ग तीन आणि वर्ग चारच्या महिला कर्मचार्‍यांचा यात समावेश आहे.
सरकारी गलेलठ्ठ पगार असणार्‍या लाडक्या बहिणींनी या योजनेचा लाभ घेतल्याचे समोर आले आहे. सरकारी नोकरी करणार्‍या 2 हजार 652 महिलांनी लाभ घेतला आहे. राज्य सरकार त्यांना दिलेली रक्कम वसुल करणार असल्याची माहिती आहे. आणखी सहा लाख कर्मचार्‍यांची अशाच पद्धतीने तपासणी केली जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. या योजनेसाठी राज्य सरकारच्या सेवार्थ प्रणालीवर नावे नोंदली गेली होती. माहिती व तंत्रज्ञान विभागाला सामान्य प्रशासन विभागाने 1 लाख 60 हजार लाभार्थींचा युआयडी डेटा उपलब्ध करून दिला. यावरुन तपासणी सुरु आहे. किती महिलांनी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेतला, याची पडताळणी होत आहे. त्यात 2 हजार 652 सरकारी नोकरी करणार्‍या महिलांच्या बँक खात्यात थेट पैसा गेल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.

-रक्कम वसुल करणार
सरकारी नोकरी करणार्‍या या लाडक्या बहिणींनी 9 महिन्यांत प्रत्येकी 13 हजार 500 रुपये घेतले. म्हणजे 3 कोटी 58 लाखांची कमाई त्यांनी योजनेतून केल्याचे उघडकीस आले आहे. या महिला ज्या विभागात काम करतात, त्या विभागाला याबाबतची माहिती देण्यात आली आहे. ही रक्कम वसुल करण्याचा आदेश सामान्य प्रशासन विभागाकडून लवकरच देण्यात येणार आहे.

संबंधित बातम्या

हे सुद्धा वाचा
Close
Back to top button