गवळीपुरा व इतवारा बाजारात 1820 किलो प्लास्टिक जप्त

2 ट्रक साहित्य केले हस्तगत

-अमरावती महापालिकेची मोठी कारवाई
अमरावती / 24 जुलै : अमरावती महानगरपालिकेच्या वतीने आज गवळीपुरा व इतवारा बाजार परिसरात प्रतिबंधित प्लास्टिकचा वापर करणार्‍यांविरोधात धडक मोहिम राबविण्यात आली. अतिरिक्त आयुक्त शिल्पा नाईक यांच्या नेतृत्वात मनपाच्या पथकाने वेगवेगळ्या दुकानांवर छापे मारुन एकुण 1820 किलो प्रतिबंधित प्लॅस्टिक कॅरिबॅग आणि प्लॅस्टिकचे विविध साहित्य जप्त केले. या कारवाईमुळे परिसरातील दुकानदारांचे धाबे दणाणले होते. प्लास्टिकच्या थैली, कप, प्लेट यांसारख्या प्रतिबंधित वस्तू जप्त करण्यात आल्या.
अज्जु खान व सुजान खान (रा. गवळीपुरा) यांनी या भागात दुकाने भाड्याने दिली असून, पवन आणि जुबेर खान हे भाडेकरु ते गोडाऊन म्हणून वापरत होते. या ठिकाणी मोठ्या प्रमाणात प्रतिबंधित प्लास्टिक साहित्य साठवले असल्याचे आढळून आले. 2 ट्रक भरलेले साहित्य ताब्यात घेण्यात आले आहे. प्लास्टिक बंदी कायद्याचे उल्लंघन केल्याप्रकरणी संबंधित विक्रेत्यांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली. ही मोहीम महानगरपालिकेच्या स्वच्छता व पर्यावरण विभागाने संयुक्तपणे राबवली.
कारवाईदरम्यान अतिक्रमण पथक प्रमुख योगेश कोल्हे, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अधिकारी जाधव व त्यांचे सहकारी, नोडल अधिकारी तथा स्वच्छता निरीक्षक विकी जेधे, ज्येष्ठ स्वास्थ निरीक्षक विजय बुरे, स्वास्थ्य निरीक्षक कुलकर्णी व सचिन सैनी, अतिक्रमण विभागाचे कर्मचारी तसेच पोलीस पथक उपस्थित होते. मनपा प्रशासनाने नागरिकांना पर्यावरणपूरक पर्यायांचा अवलंब करण्याचे आवाहन केले असून, प्लास्टिकच्या वापराविरोधात अशाच कठोर मोहिमा भविष्यातही राबविल्या जाणार असल्याचे स्पष्ट केले आहे. या कारवाईमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.
अमरावती महानगरपालिकेच्या अतिरिक्त आयुक्त शिल्पा नाईक यांनी आज गवळीपुरा व इतवारा बाजार परिसरात पार पडलेल्या धडक कारवाईदरम्यान नागरिकांना स्पष्ट शब्दांत आवाहन केले की, प्लास्टिकचा वापर केवळ कायद्यानेच नव्हे, तर आपल्या पर्यावरणाच्या दृष्टीने देखील घातक आहे. प्रतिबंधित प्लास्टिकचा साठा करणे किंवा वापरणे हा गंभीर गुन्हा असून, अशा प्रकारांवर मनपा कठोरपणे कारवाई करत राहणार आहे. नागरिकांनी आणि व्यावसायिकांनी स्वयंस्फूर्तीने प्लास्टिकचा वापर थांबवावा व पर्यावरणपूरक पर्याय स्वीकारावेत.
त्यांनी पुढे सांगितले की, स्वच्छ, आरोग्यदायी व सुरक्षित अमरावतीसाठी आपण सर्वांनी एकत्र येणे गरजेचे आहे. ही केवळ महानगरपालिकेची जबाबदारी नसून प्रत्येक नागरिकाची जबाबदारी आहे. पुढील काळात अशा कारवाया अधिक व्यापक प्रमाणात केल्या जातील. त्यामुळे कोणतीही दया दाखवली जाणार नाही. प्लास्टिकमुक्त अमरावती ही आपल्या सगळ्यांची सामूहिक जबाबदारी आहे, असे सांगून त्यांनी सर्व विक्रेते, दुकानदार व नागरिकांना यामध्ये सक्रिय सहभाग घेण्याचे आवाहन केले.

संबंधित बातम्या

Back to top button