बूथ एजंट्सने आक्षेप का घेतला नाही?

एकाच महिलेचा 223 वेळा फोटो तर...

* निवडणूक आयोगाचा राहुल गांधींना सवाल

नवी दिल्ली/5 नोव्हेंबर – काँग्रेस नेते तथा लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी पुन्हा एकदा निवडणुक आयोगाला व्होटचोर म्हटले आहे. हरियाणामध्ये एका ब्राझिलियन मॉडेलचा फोटो वापरुन 22 वेळा मतदान करण्यात आले. एकाच महिलेचा फोटो मतदार यादीत 223 वेळा असल्याचा आरोप राहुल गांधी यांनी पत्रकार परिषदेत केला. राहुल गांधी यांचे आरोप खोटे आणि निराधार असल्याचे हरियाणा निवडणूक आयोगाच्या अधिकार्‍याने म्हटले आहे.
राहुल गांधी यांनी निवडणूक आयोगावर व्होटचोरी आणि भारतीय जनता पक्षावर सरकार चोरीचा आरोप केला. बिहार विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील मतदानाच्या एक दिवस आधी राहुल गांधी यांनी पत्रकार परिषद घेऊन हरियाणा विधानसभा निवडणुकीत घोटाळा झाल्याचा आरोप केला. हरियाणामध्ये ब्राझिलियन मॉडेलचे मतदार कार्ड तयार होते आणि ती मॉडेल 22 ठिकाणी वेगवेगळ्या नावाने मतदान करते, असा आरोप राहुल गांधी यांनी केला. राहुल गांधी यांच्या आरोपांना निवडणूक आयोगाने तातडीने प्रत्युत्तर दिले आहे. आयोगाने विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांचे आरोप निराधार असल्याचे म्हटले आहे. एका वृत्तसंस्थेने हरियाणा निवडणूक आयोगाच्या अधिकार्‍यांसोबत बातचीत केली. ते म्हणाले की, राहुल गांधी यांनी जे पुरावे दाखवले आहेत, त्यासंबंधी कोणतीही तक्रार आयोगाकडे केलेली नाही. तसेच काँग्रेसच्या बूथ लेव्हल एजंट्सने या संबंधीचा आक्षेप तेव्हाच का घेतला नाही?राहुल गांधी यांना सवाल करत आयोगाने विचारले आहे की, राजकीय पक्षांकडून निवडणूकीत मतदानावर लक्ष ठेवण्यासाठी बूथ लेव्हल एजंट्स नेमले जातात. त्यांनी मतदार यादीतील या नावांबद्दल तेव्हाच विरोध का केला नाही. मतदार यादीची पडताळणी करताना काँग्रेसच्या एजंट्सने आक्षेप का घेतला नाही, असेही सवाल आयोगाने केला आहे. राहुल गांधी यांच्या या आरोपांवर हरियाणा राज्य निवडणूक आयोगाने उत्तर दिलं आहे. आयोगाने 15 मुद्दे मांडत एक्स या मायक्रोब्लॉगिंग प्लॅटफॉर्मवर एक पोस्ट केली आहे. निवडणूक आयोगाने म्हटलं आहे की मतदार याद्यांची पडताळणी झाली तेव्हा काँग्रेससह विविध पक्षांच्या बूथ लेव्हल एजंट्सनी त्यावर आक्षेप का घेतले नाहीत?

संबंधित बातम्या

Back to top button