पहलगाम हल्ल्याप्रकरणी दोघांना अटक

-दहशतवाद्यांना आश्रय दिल्याचे उघड

श्रीनगर / 22 जून: पहलगाम हल्ल्याला दोन महिने होऊन गेले आहेत. या हल्ल्याप्रकरणी राष्ट्रीय तपास संस्थेने (एनआयए) मोठी कारवाई करत दोघांना अटक केली आहे. दहशतवादी हल्ला प्रकरणी तब्बल 27 नागरिकांची हत्या करणार्‍या तीन दहशतवाद्यांना या दोघांनी आश्रय दिल्याची माहिती आहे. विशेष म्हणजे आश्रय दिलेले दोघेही बंदी घातलेल्या लष्कर ए तय्यबा या दहशतवादी संघटनेशी संबंधीत आहेत. अटक केलेल्यांची नावे परवेझ जोथर, बशीर जोथर अशी आहेत. परवेझ जोथर हा बटकोट येथील रहिवासी असून बशीर हा पहलगाममधील हिलपार्क येथील रहिवाशी आहेत. पहलगाममध्ये पर्यटकांना हल्ला करणार्‍या दहशतवाद्यांना या दोघांनीही आश्रय दिला होता.
पहलगाममध्ये पर्यटनासाठी गेलेल्या तब्बल 27 पर्यटकांना त्यांचा धर्म विचारून दहशतवाद्यांनी गोळ्या घातल्या होत्या. हल्ला करणार्‍या दहशतवाद्यांची ओळख त्यानंतर समोर आली. हाशिम मुसा उर्फ सुलेमान,आदिल हुसैन,अलिभाई उर्फ तल्हाभाई अशी त्यांची नावे होती. या तीनही दहशतवाद्यांना परवेझ जोथर, बशीर जोथर यांनी आश्रय देत हल्ल्यासाठी मदत केल्याची माहिती आहे. पहलगाम हल्ल्यानंतर भारती लष्कराने थेट पाकव्याप्त काश्मीरमध्ये हल्ला करत दहशतवाद्यांचे अड्डे उद्धवस्त केले. या मिशनला ऑपरेशन सिंदूर नाव देण्यात आले होते. ऑपरेशन सिंदूरनंतर भारत पाकिस्तानध्ये युद्ध देखील झाले. डोनाल्ड ट्रम्प यांच्या मध्यस्थीने दोनही देशांमध्ये शस्त्रसंधी झाली आहे. मात्र, ऑपरेशन सिंदूर अजून थांबलेले नाही, असे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी स्पष्ट केले आहे.

संबंधित बातम्या

Back to top button