बिजापूरमध्ये चकमकीत तीन नक्षलवादी ठार

बिजापूर/6 नोव्हेंबर – छत्तीसगड-तेलंगणा सीमेवरच्या घनदाट जंगलात सुरक्षा दल आणि नक्षलवाद्यांमध्ये जोरदार चकमक सुरु आहे. या धक्कादायक कारवायात आतापर्यंत तीन नक्षलवाद्यांचा मृत्यू झाल्याचे वृत्त आहे. मात्र, पोलिसांनी अद्याप अधिकृत पुष्टी केलेली नाही. वृत्तानुसार, ही चकमक बिजापूर जिल्ह्यातील तारलागुडा परिसरातील अन्नाराम व मरीमल्ला जंगलात घडत आहे. नक्षलवादी कारवायांची माहिती मिळाल्यानंतर सुरक्षा दलांचे एक संयुक्त पथक शोध मोहिमेसाठी रवाना झाले होते. त्यावेळी दबा धरलेल्या नक्षलवाद्यांनी गोळीबार सुरू केला, तर जवानांनीही प्रत्युत्तर दिले. चकमकीच्या ठिकाणाहून काही शस्त्रे आणि नक्षलवादी साहित्य जप्त करण्यात आले आहे. दाट जंगल आणि कठीण भूभागामुळे ऑपरेशन सैनिकांसाठी अत्यंत आव्हानात्मक बनले आहे.




