शेतकर्‍यांसाठी हजारो कोटींची तरतूद

केंद्रीय मंत्रिमंडळाचे 6 निर्णय जाहीर

-इटारसी- नागपूर चौथ्या रेल्वे मार्गाला मंजुरी
नवी दिल्ली/ 31 जुलै : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली गुरुवारी झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत शेतकरी आणि रेल्वेशी संबंधित सहा मोठे निर्णय घेण्यात आले. यामध्ये दोन निर्णय शेतकर्‍यांशी, तर चार निर्णय रेल्वेशी निगडीत असल्याची माहिती केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी दिली.
बैठकीत प्रधानमंत्री किसान संपदा योजना (पीएमकेएसवाई) साठी 15 व्या वित्त आयोगाच्या कालावधीत (2021-22 ते 2025-26) अतिरिक्त 1,920 कोटी रुपयांच्या खर्चाला मंजुरी देण्यात आली. यामुळे या योजनेचे एकूण बजेट आता 6,520 कोटी रुपयांपर्यंत वाढले आहे. या अंतर्गत 50 बहुउत्पादन अन्न विकिरण युनिट्स स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तसेच अन्न सुरक्षा आणि गुणवत्ता हमी पायाभूत सुविधा योजनेअंतर्गत 100 एनएबीएल मान्यताप्राप्त अन्न चाचणी प्रयोगशाळा उभारल्या जाणार आहेत. यासाठी 1,000 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. विविध घटक योजनांअंतर्गत प्रकल्पांसाठी 920 कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे.
या युनिट्स कार्यान्वित झाल्यानंतर दरवर्षी 20 ते 30 लाख मेट्रिक टन अन्न उत्पादनांची चाचणी क्षमता निर्माण होईल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे. खाजगी क्षेत्राच्या माध्यमातून स्थापन होणार्‍या प्रयोगशाळांमुळे अन्न चाचणीसाठी आधुनिक सुविधा उपलब्ध होतील आणि अन्न सुरक्षा मानकांची पूर्तता होईल. याशिवाय, सहकारी क्षेत्र बळकट करण्यासाठी राष्ट्रीय सहकारी विकास महामंडळाचे (एनसीडीसी) भांडवल 2,000 कोटी रुपयांनी वाढवण्यात आले आहे. पुढील चार वर्षांत दरवर्षी 500 कोटी रुपयांचे कर्ज दिले जाणार असून, एकूण 20,000 कोटी रुपयांचे कर्ज वितरीत होईल. याचा लाभ सुमारे 13 हजार सहकारी संस्था आणि 3 कोटी सदस्यांना होणार आहे.
रेल्वेसंबंधी घेतलेल्या महत्त्वाच्या निर्णयांमध्ये इटारसी ते नागपूर दरम्यान चौथ्या मार्गाला मंजुरी देण्यात आली आहे. तसेच अल्याबारी ते न्यू जलपाईगुडी दरम्यान तिसरा व चौथा मार्ग उभारणीस मंजुरी प्रदान करण्यात आली. छत्रपती संभाजीनगर ते परभणी दरम्यान दुहेरीकरणाला हिरवा कंदील दाखविण्यात आला. या प्रकल्पांमुळे रेल्वे वाहतूक सुलभ होईल व प्रवाशांच्या तसेच मालवाहतुकीच्या गतीमध्ये वाढ होईल, अशी अपेक्षा आहे.

संबंधित बातम्या

Back to top button