राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूंच्या कार्यक्रमात प्रोटोकॉलचे उल्लंघन

* कार्यक्रमाचे ठिकाण अचानक बदलल्याने वाद
नवी दिल्ली/8 मार्च -पश्चिम बंगालमध्ये राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या दौर्यादरम्यान प्रोटोकॉलचे उल्लंघन झाल्याचा प्रकार समोर आल्यानंतर केंद्र सरकारने या प्रकरणाची गंभीर दखल घेतली आहे. केंद्रीय गृह मंत्रालयाने राज्याचे मुख्य सचिव यांना पत्र पाठवून संपूर्ण घटनेबाबत सविस्तर अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले आहेत. या अहवालात राष्ट्रपतींना अपेक्षित प्रोटोकॉल न देणे, मार्गाबाबत योग्य माहिती न देणे, तसेच इतर व्यवस्थां मधील त्रुटींबाबत स्पष्टीकरण मागितले आहे. राष्ट्रपती मुर्मू या उत्तर बंगाल दौर्यावर असताना दार्जिलिंग जिल्ह्यातील 9व्या आंतरराष्ट्रीय संथाल परिषदेत मुख्य अतिथी म्हणून सहभागी झाल्या होत्या. सुरुवातीला हा कार्यक्रम फांसीदेवा ब्लॉकमधील बिधाननगर येथे आयोजित करण्याचे ठरले होते, जेथे मोठ्या संख्येने संथाल आदिवासी समाजातील लोक उपस्थित राहू शकले असते. मात्र राज्य प्रशासनाने सुरक्षा, गर्दी आणि इतर कारणे सांगत कार्यक्रमाचे ठिकाण बागडोगरा विमानतळाजवळील गोसाईंपूर येथे हलवले. राष्ट्रपतींनी स्वतः या बदलाबाबत नाराजी व्यक्त करत नवीन ठिकाण लहान असल्याने अनेकांना कार्यक्रमात सहभागी होता आले नसल्याचे सांगितले.यावेळी त्यांनी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना लहान बहीण म्हणत विचारले की, त्या त्यांच्यावर नाराज आहेत का? कारण ना मुख्यमंत्री आणि ना कोणताही मंत्री त्यांना स्वागतासाठी उपस्थित होता.




